Central Primary Schools : रथातून चिमुकल्यांचे शाळेत स्वागत, प्रवेशोत्सव उत्साहात File Photo
छत्रपती संभाजीनगर

Central Primary Schools : रथातून चिमुकल्यांचे शाळेत स्वागत, प्रवेशोत्सव उत्साहात

नारेगावात मनपाचा शहरस्तरीय कार्यक्रम; मैदानासाठी ५० लाख

पुढारी वृत्तसेवा

Little ones welcomed to school in a chariot; enthusiastic Praveshotsav

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव येथे सोमवारी (दि. १५) शहरस्तरीय शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी सजविलेल्या रथातून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन करून त्यांचे विशेष स्वागत करण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले. या कार्यक्रमाला राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजुरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महापालिकेकडून आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. पूर्वी शाळेत जाताना मुले रडत असत, मात्र आता विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत उत्साह आणि आकर्षण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके आणि विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा आनंद वाढल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी शाळेच्या मैदानाच्या विकासासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची मदत जाहीर करून उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळविला.

तसेच अन्नामृत योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक व स्वच्छ भोजन उपलब्ध करून दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर शाळेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येणार असून संरक्षण भिंतीचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी पालकांना केले. यावेळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, असेही त्यांनी सांगितले.

मैदान विकासासाठी ५० लाखांची भेट

नारेगाव येथील मनपा शाळेच्या मैदानाच्या विकासासाठी मंत्री अतुल सावे यांनी आमदार निधीतून ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली. या निधीतून विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना पूरक सुविधा उभारण्यात येणार असून, शाळेच्या विकासाला चालना मिळणार आहे.

चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित

शाळेच्या पहिल्याच दिवशी सजविलेल्या रथातून विद्यार्थ्यांचे आगमन घडवून आणण्यात आले. पुष्प, चॉकलेट, नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांच्या वितरणामुळे चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनोख्या स्वागतामुळे प्रवेशोत्सव विद्यार्थी आणि पालकांसाठी संस्मरणीय ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT