Encroachment Removal Action : मुकुंदवाडीसारखीच पैठणगेटवरही मनपाकडून पाडापाडीची तयारी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Encroachment Removal Action : मुकुंदवाडीसारखीच पैठणगेटवरही मनपाकडून पाडापाडीची तयारी

परिसरातील ९ व १५ मीटर रस्त्यावरील स्टेशनसह पूर्ण,बाधित मालमत्तांची होणार मार्किंग

पुढारी वृत्तसेवा

Like Mukundwadi, the Municipal Corporation is preparing for a ancroachment removal at Paithangate as well.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठणगेट परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवरील किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या खुनानंतर परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून मुकुंदवाडीप्रमाणेच पैठणगेट परिसरात पाडपाडीची मोहीम हाती घेण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला असून, गुरुवारी (दि.१३) नगररचना आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने टोटल स्टेशन सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या सव्र्व्हेनंतर बाधित मालमत्तांची मार्किंग व नोटीस बजावण्याची आणि त्यानंतर शनिवारी (दि. १५) अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली जाण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

पैठणगेट भागात सोमवारी (दि.१०) रात्री अंडाभुर्जीच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेनंतर सिल्लेखाना आणि पैठणगेट परिसरात बुधवारी (दि.१२) मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, मंगळवारी कुरेशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयासमोर ठिय्या देत अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधित दोन दुकानांवर नोटीस चिकटवली.

ही नोटीस अनधिकृत बांधकामासंदर्भात असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले. बांधकाम परवानगी व मालकी हक्काच्या कागदपत्रांची मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. मात्र प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी नगर रचना विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने पैठणगेट परिसरातील ९, १५ आणि ३० मीटर मार्गावर टोटल स्टेशन सर्वेक्षण सुरू करण्यात आले. संपूर्ण दिवसभर हा सर्वेक्षण उपक्रम सुरू होता.

यात पैठणगेट ते सिल्लेखाना चौक, पैठणगेट ते सब्जीमंडी व पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती मालमत्ता रस्ता बाधित होतील हे टोटल स्टेशन सर्वेक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, बाधित मालमत्तांची मार्किंग करून त्यांना नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे झोन क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांनी सांगितले. मात्र पाडापाडीच्या शक्यतेने व्यापारीवर्गात प्रचंड धास्तीचे वातावरण आहे.

यावेळी नगर रचना विभागाचे राहुल मालखरे, साहाय्यक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या पथकाने हे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले असून, नागरी पथकाच्या कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती.

आरखड्याप्रमाणे रस्त्यांचे रुंदीकरण

पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता ३० मीटरचा तसेच पैठण गेट ते सब्जीमंडी हा रस्ता ६ मीटरचा, पैठण गेट ते खोकडपुऱ्याकडे जाणारा रस्ता १५ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे.

उद्या कारवाईची शक्यता पैठणगेट परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेला अनधिकृत दुकानाची पाश्र्वभूमी असल्याचे समोर आल्यानंतर या भागातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी टोलट स्टेशन सर्व्हे करण्यात आला. शनिवारी या भागात कारवाई होण्याची शक्यता आहे.
- संतोष वाहुळे, अतिक्रमण हटाव संनियंत्रण अधिकारी, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT