Market Committee : अखेर दोन व्यापाऱ्यांचे परवाने रद्द file photo
छत्रपती संभाजीनगर

Market Committee : अखेर दोन व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

शेतकऱ्यांच्या रुद्रावतारापुढे बाजार समिती प्रशासन नमले, ठिय्या आंदोलनाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Licenses of two traders finally cancelled

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व कर्मचाऱ्यांशी अरेरावी आणि अपमानास्पद वर्तन केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.११) सकाळी बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते.

संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द झाल्याशिवाय मार्केट सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वाढता आक्रोश पाहून बाजार समिती प्रशासनाने तातडीने दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले. तसेच ते कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी संचालक मंडळाच्या आगामी तातडीच्या सभेत ठराव घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बगडी येथील शेतकरी दत्तू बोडखे यांनी बाजार समितीचे लेखापाल जी. सी. ठवाळ यांच्याकडे सोमवारी सायंकाळी मिलन ट्रेडिंग कंपनी व मिल्लत ट्रेडिंग कंपनी च्या व्यापारी व प्रतिनिधींनी अरेरावी करून अपमानास्पद वर्तन केल्याची तक्रार होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बगडी व परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन दिले.

यानंतर मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बाजार समिती कार्यालय गाठले. कार्यालयासमोर ठिय्या देत घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, मुजोर व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा' अशा मागण्यांनी परिसर दणाणून गेला. जोपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत बाजार समितीचे कामकाज सुरू करू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच बाजार समितीचे सचिव मनीष गजभिये, उपसभापती सचिन काकडे व विजय हिवाळे, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ निलंबित केल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.

तसेच कायमस्वरूपी परवाने रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या आगामी तातडीच्या सभेत प्राधान्याने घेण्यात येईल, असे लेखी पत्र शेतकऱ्यांना देण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन परिविक्षाधीन तहसीलदार सागर वाघमारे यांनाही दिले. प्रशासनाकडून कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असले तरी ते कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय अद्याप संचालक मंडळाच्या सभेत होणे बाकी आहे. त्यामुळे लेखी आश्वासनानंतर आता प्रत्यक्ष ठराव कधी होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाला विविध पक्षांचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक शिरसाठ यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून बाजार समिती प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT