मुकेश चौधरी
छत्रपती संभाजीनगर : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर सध्या बिबट्यांच्या वाढत्या वावराची भीती वाढली असून, २०२५ या वर्षात बिबट्या १०० ते १२० वेळा दिसल्याची अधिकृत नोंद आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वैजापूर तालुक्यातील तीन मानवी मृत्यू, तर संपूर्ण जिल्ह्यात ३०० हून अधिक पशुधन बळी गेल्याने हे धोकादायक असल्याचे मानले जात आहे.
ग्रामीणसह शहरी भागातही बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. बिबट्यांचा वाढता वावर हा केवळ वन्यजीवांचा प्रश्न नसून, पर्यावरणीय समतोल, कचरा व्यवस्थापन, जंगलसंवर्धन आणि प्रशासनिक समन्वय यांची एकत्रित परीक्षा असल्याचे मानले जात असून, वेळेत ठोस उपाययोजना न झाल्यास मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील ९ तालुक्यांत सुमारे ४० ते ५० बिबटे सक्रिय असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गत वर्ष २०२५ मध्ये १०० ते १२० वेळा बिबट्या दिसल्याची अधिकृत नोंद झाली असून, वैजापूर तालुक्यात तीन मानवी मृत्यूंची दुर्दैवी घटना घडली आहे. ३०० हून अधिक पशुधनांवर (गाय, बैल, बकरी, मेंढ्या आदी) हल्ले झाल्याची माहितीही समोर आली आहे.
इतकी गंभीर परिस्थितीती असतानाही वन विभागाकडून आकडेवारी देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मात्र एकच बिबट्या अनेक ठिकाणी दिसू शकतो, त्यामुळे नेमकी संख्या सांगणे कठीण आहे, असे स्पष्टीकरण देत वन विभाग जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. तर शेतकऱ्यांनी आपली जनावरे मोकळ्या जागेत बांधू नयेत, सुरक्षित गोठ्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे. मात्र वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केवळ सूचनांपुरती मर्यादित न राहता वन विभागाकडून ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रजनन दर वाढल्याचा अंदाज
जंगलतोड, वनजमिनीवरील अतिक्रमण, गायरान क्षेत्रांचे रूपांतर, ऊस-मका यासारख्या घनदाट क्षेत्रांमध्ये वाढ आणि रस्ते-राजमार्ग विस्तारामुळे बिबट्यांचे पारंपरिक अधिवास कमी होत आहे. यावर्षी पाच ते सहा महिने चांगला पाऊस झाल्याने वन्यजीवांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन प्रजनन दर वाढल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पशुधन हानी
वैजापूर-गंगापूर पट्ट्यात १५ ते २० बिबट्यांची हालचाल असून, ५१ पशुधन हल्ल्यांची नोंद आहे. कन्नडमध्ये १० ते १५ बिबटे आणि ११५ हून अधिक पशुधन हल्ले, तर सिल्लोड-फुलंब्री परिसरात ५ ते ७ बिबटे आणि २३ हल्ल्यांची माहिती समोर आली आहे. पैठणमध्ये १०० पशुधन बळी गेले आहेत.
वैजापूर-गंगापूर भागात ७५ लाख रुपयांची मदत
काही तालुक्यांत मोजके पिंजरे लावले असले तरी संवेदनशील भागांत मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, पशुधन व मानवी हानीबाबत नुकसान भरपाईसाठी महाफॉरेस्ट पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वैजापूर-गंगापूर भागात सुमारे ७५ लाख रुपयांची मदत वितरित झाल्याची माहिती आहे. तरीही नुकसान भरपाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अन्यथा वाढणार धोका -ग्रामीण परिसरातील काही भागांत, विशेषतः वजापूर, मपूर, पेठा आणि अजंठा सिल्लोड या क्षेत्रांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वेगाने वाढत आहेत. ओला-सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले, तर बिबट्यांचा वस्त्यांकडे ओढा कमी होईल, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे भटक्या कुर्त्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे बिबट्यांना सहज शिकार उपलब्ध होते.सुवर्णा माने, उपवनसंरक्षक
१५ ते २० किमीपर्यंत असतो वावर- 66 बिबट्या साधारणतः १५ ते २० किमी परिसरात वावरतो, ज्यामध्ये ५ ते ६ गावे येतात. ते दोन कळपात राहत नाहीत. त्यामुळे एकाच बिबट्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्याच्या तक्रारी अनेकदा मिळतात. नर आणि मादी सहवासाच्या काळात एकत्र राहतात. बिबट्याची पिल्ले साधारण ६ ते ७ महिने आईसोबत राहतात. प्रौढ झाल्यानंतर ते स्वतःची शिकार आणि हद्द निश्चित करतात.पी. बी. भिसे, वनपरिक्षेत्र