पिशोर: कन्नड तालुक्यातील सारोळा- जवखेडा शिवारातील (गट क्र.- २२३) येथे बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी अनिता मोतीलाल शिखरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर वन्यप्राणी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी (दि. २०) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना शेतामध्ये लावलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात थरारक स्वरूपात कैद झाली आहे.
पहाटेच्या शांत वातावरणात अचानक बिबट्याने गोठ्याच्या परिसरात प्रवेश करून कुत्र्यावर झडप घातल्याचे स्पष्टपणे सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसून येते. काही क्षणांतच बिबट्याने कुत्र्याला ठार करून परिसरातून पसार झाल्याने शेतकरी कुटुंबासह आसपासच्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले.
या परिसरात यापूर्वीही वेळोवेळी वन्यप्राण्यांचा वावर जाणवत होता. मात्र, सध्या बिबट्याच्या थेट उपस्थितीमुळे महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळेस शेत परिसरात जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल आर. एम. शेख, वनरक्षक के. पी. खोकड, कर्मचारी आरेफ व भिवसने यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी शेतकरी अनिता शिखरे, जगदीश शिखरे, राहुल शिखरे, रामदास कळम, गणेश बनकर, संतोष बनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे, रात्रीच्या वेळी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे, शेतातील गोठे व घरांच्या परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवण्याचे, तसेच पाळीव व लहान जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले. बिबट्याच्या संभाव्य हालचाली लक्षात घेता नागरिकांनी रात्री एकटे फिरणे टाळावे, संशयास्पद हालचाल किंवा बिबट्याचा वावर दिसून आल्यास त्वरित वनविभाग किंवा प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन वनपाल आर. एम. शेख यांनी केले आहे.