पिंपळदरी : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात मंगळवारी (दि.१६) दुपारी चार वाजता बिबट्याचे दर्शन घडले. अचानक लेणी परिसरात बिबट्या फिरताना दिसल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. काही पर्यटकांनी भीतीने आपला प्रवास अर्ध्यावरच थांबवून परतण्याचा निर्णय घेतला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की “बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठिकाणी कॅमेरे बसवने गरजेचे आहे. पर्यटकांनी तसेच गावकऱ्यांनी अनावश्यकपणे एकटे जंगल भागात जाऊ नये, घाबरून न जाता काळजी घ्यावी.”
दरम्यान, मागील दोन महिन्यांत या परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या एकूण पाच घटना समोर आल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी जवळच्याच गावात एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्री कुंपण लावणे, जनावरांना गोठ्यातच ठेवणे अशी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.“गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या पायाच्या ठसे दिसत होते.
दरम्यान, काही नागरिकांनी बिबट्याचा मोबाईल व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला असून, तो व्हायरल होत आहे. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने काळजी घेवून पिंजरे बसवणे गरजेचे आहे. जेणे करून अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकात भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही.