छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : बछड्यासह बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी

स्वालिया न. शिकलगार

गंगाखेड (छत्रपती संभाजीनगर) : पुढारी वृत्तसेवा – गंगापूर शहरालगत लगड वस्तीजवळ बिबट्याचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. गंगापूर शहरालगत असलेल्या नबाबपूर रोडवरील लगड वस्तीवर गव्हाच्या शेताला पाणी भरताना बिबट्याचे पिल्लू आढळले. शेतकऱ्यांनी त्याला पकडून वस्तीवर बांधून आणले. नंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर त्याला परत त्या ठिकाणी सोडून देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या-

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूरपासून जवळच असलेल्या मच्छिंद्र लगड आणि कैलास लगड यांच्या गट नंबर २५१ मधील शेतात ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ज्ञानेश्वर गोविंद लगड हे गव्हाच्या शेतात पाणी भरत होते. बिबट्याचे पिल्लू आणि बिबट्या फिरताना दिसले असता त्यांनी वस्तीवर राहणाऱ्या कैलास गोविंद लगड, अनिल गोविंद लगड या आपल्या भावांना आवाज देऊन बोलावले. त्यांनी फटाके फोडले असता मादी बिबट्या पळून गेली. परंतु बिबट्याचे तीन ते चार महिन्याचे पिल्लू हे वस्तीकडे पळाले. त्यावेळी या शेतकरी बंधुंनी पिल्लाला पकडून डाल्याखाली झाकून ठेवले.

या घटनेची माहिती वनविभागाला कळविले असता वनविभागाचे वनरक्षक नारायण चाथे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वनविभाग वैजापूरच्या वरीष्ठ अधिकारी वनपाल अनिल पाटील, वनसेवक, डी. एस. सुर्यवंशी, ए एस गवळी यांना संपर्क करून घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर सदरील पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदरील शेतकऱ्यांनी विचारले असता बिबट्याही या परिसरामध्ये फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सदरील पिल्लाला जिथे पकडले त्याच ठिकाणी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान नेऊन गट नंबर २५० मध्ये मोकळे सोडून दिले.

मादी बिबट्या गव्हाच्या शेतात फिरत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. मादी बिबट्यासह आणखी पिल्ले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT