घुसूर शिवारात पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाच्या पथकाने यशस्वी सुटका केली Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Leopard Rescue Sambhajinagar | पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका

कन्नड तालुक्यातील घुसूर शिवारातील घटना, वन विभागाची तत्पर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Kannad Leopard In Well

हतनूर : कन्नड तालुक्यातील घुसूर शिवारात शनिवारी (दि.२०) पहाटे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाच्या पथकाने यशस्वी सुटका केली. वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात असताना हा बिबट्या शेतकरी संदीप नलावडे यांच्या शेतातील विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्याने तत्काळ वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक पिंजरा व आवश्यक सुरक्षा साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्या विहिरीत शांतपणे बसलेला असल्याने बचावकार्य काळजीपूर्वक राबविण्यात आले. दोरीच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत उतरविण्यात आला. काही वेळातच बिबट्या पिंजऱ्यात शिरताच त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले.

यानंतर पशुधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत तो पूर्णपणे सुदृढ असल्याचे आढळून आले. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

दरम्यान, विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT