दौलताबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात व डोंगरालगत असलेल्या जंगलात मुक्तसंचार करत नजरेत पडलेला बिबट्याचे पिल्लू सोमवारी (दि. १३) देवगिरी किल्ल्यात मिनारजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकले. पिंजऱ्याजवळ काही वेळ थांबलेली त्याची आई मात्र नंतर तेथून निघून गेल्याने तिचा शोध सुरू आहे.
परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने शनिवारी (दि. ११) किल्ला परिसरात पिंजरा लावला होता. रविवारी रात्री एक बिबट्याचे पिल्लू या पिंजऱ्यात अडकले.पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याची आई असलेली मादी बिबट्या पिंजऱ्याजवळच बराच वेळ ठाण मांडून बसली होती. पिल्लापासून दूर झाल्याने ती अस्वस्थ झाली होती आणि वारंवार डरकाळ्या फोडत होती.
या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक सुवर्ण माने,सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण ,वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधीर धवन ,वनरक्षक राम मुळे, भाग्यश्री फड,विजय चव्हाण, प्रभू हजारे,वन्यजीव रक्षक आशिष जोशी, किल्याचे संरक्षण सहायक नीलेश कोळी,रवींद्र घाटे, विद्यानंद मोहड, पोलिस हवालदार शरद बच्छाव, किशोर बोडखे हे परिसरात ठाण मांडून आहे .मादी बिबट्या जंगलात परतल्यानंतर वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
पर्यटकांना खबरदारी घेण्याची सूचना
घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना त्यांनी दिल्या आहे. पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागान व पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.दरम्यान,आरोग्य पथकाने पिल्लूची तपसणी केल्यावर अधिवासात सोडण्याचा निर्णय होणार आहे.