हतनूर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर येथे कारभारी मनाजी गवळी यांच्या नांगरणी केलेल्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवार (दि.१३) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान हे पिल्लू आढळून आले. (Chhatrapati Sambhaji Nagar News)
हतनूर येथील तिसगाव घुसूर रस्तावर रविवारी बिबट्याचे एक पिल्लू कारभारी गवळी यांना आढळून आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. सायंकाळी ७. ३० वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोपे, वनरक्षक अधिकारी के. आर. जाधव, वन कर्मचारी अशोक आव्हाड, पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा पिल्लाला तेथेच सोडण्यात आले असून त्यावर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
हतनूर परिसरातील निमडोंगरी, चिकलठाण, टापरगाव, रुईखेडा, शिवराई, तिसगाव, घुसूर, जैतापूर, आठेगाव, जळगावघाट, चापानेर, खेडा, आलापूर, अंतापूर, केसापूर, बनशेंद्रा, आदी गावांच्या डोंगर परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. शिवारात बिबट्या भरदिवसा फिरताना निदर्शनास येत आहे. तसेच डोंगरात व शिवारात दिसणारा बिबट्या आता रात्रीच्या वेळी अथवा पहाटेच्या सुमारास गावालगत फिरत असताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.