1993 ला किल्लारी परिसर भूकंपाने हादरला, तेव्हा आतासारखे टीव्ही, सोशल मीडियाचे जाळे नव्हते. दूरदर्शनही मोजक्याच भागात दिसत होते. अशा काळात वृत्तपत्रात काम करणार्या प्रतिनिधींनी भूकंप लोकांपर्यंत पोहचविला. तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे अनेक पत्रकार लातूरकडे धावले होते. त्यात सध्या दै. ‘पुढारी’ छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे वृत्तसंपादक असणारे उमेश काळे यांनी भूकंपाचे कव्हरेज केले होते. त्यांना आठवत असणारा भूकंप त्यांच्याच शब्दात.
उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : ‘...ही माझी आई, हे माझे वडील, हा माझा मुलगा..आता मी एकटा उरलोय’ लातूरच्या सरकारी रुग्णालयातील भूकंपानंतरचा प्रसंग आणि त्या व्यक्तीचा दु:खी चेहरा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. त्यादिवशी तारीख होती 30 सप्टेंबर, 1993. सकाळी आकाशवाणीच्या बातम्यात किल्लारी भूकंप ऐकला आणि संभाजीनगरातील काही पत्रकारांचा चमू थेट लातूरकडे निघाला..
तेव्हा संभाजीनगर- लातूर असा टार रोड नव्हता.. सिंगल वे.. सायंकाळी पाच वाजता किल्लारीत पोहचलो. किल्लारीचे सरपंच सिद्रामप्पा पडसलगे भेटले. त्याकाळात किल्लारीला वर्षभरात दोनशेवर छोटेमोठे धक्के बसले होते.‘आम्ही सरकारकडे पुनर्वसाची मागणी लावून धरली होती, पण सरकारने दुर्लक्ष केले, किल्लारीची माणसे मारली हो..’ असे त्यांनी सांगितले. किल्लारीत जिकडेतिकडे घरे पडलेली, मृतदेहांचा खच. वाटेत तत्कालिन विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे भेटले. ते किल्लारी परिसराचा दौरा करून आले होते. भूकंपाची तीव्रता केवळ किल्लारी नाही..तर लातूर, धाराशिवमधील अनेक गावांना धक्का जाणवलाय.., असे त्यांनी सांगितल्यावर भूकंपाची भीषणताही कळाली. रात्र झाल्यामुळे लातूरला निघालो..ते थेट सरकारी रुग्णालयात..मृतांचे नातेवाईक आणि जखमींच्या वेदना तेथेच समजल्या.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शरद पवार होते. ते सकाळीच किल्लारीत पोहचले होते. पहिला दिवस असल्यामुळे मदतकार्यात सुसूत्रता नव्हती. भूकंपाची भयानकता पाहता त्यांनी प्रशासनाच्या मदतीला लष्कर बोलाविले.
एक ऑक्टोबरला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रमोद महाजनांसह दाखल झाले. लष्कर, पोलिस प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना दिसत नाही, ही महाजनांनी पत्रकारांकडे केलेली तक्रार. किल्लारी, तळणी, कवठा, एकोंडी, सास्तूर अशा गावांचा त्यांच्यासोबत दौरा केला. एवढी मोठी दुर्घटना होऊन 24 तास उलटले, अजून ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही, चार पाच पोलिस परिस्थिती कशी सांभाळणार, अडवाणी यांनी प्रशासनाच्या मर्मावर बोट ठेवले होते.
घर, पत्रे पडूनही जिवंत
एव्हाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्याला सुरवात केली होती. दोन ऑक्टोबरला गांधी जयंती. त्यादिवशी आम्ही औशात होतो. मंजनबाई नावाची महिला आम्हाला रुग्णालयात भेटली. पहाटे चारच्या सुमारास ती उठली होती. अचानक गडगड असा आवाज झाला आणि घरावरील पत्रे, भिंत तिच्या अंगावर. पत्र्यामुळे थोडीशी हवा भेटत होती, लोकांना वाटले बाई गेली असावी, पण पत्रे काढले तर जिवंत. अशा एक ना अनेक दैवयोगाच्या कथा. उमरगा विश्रामगृहात तत्कालिन मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, राज्यमंत्री अशोक चव्हाण हे धाराशिव जिल्ह्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवून होते. सामाजिक संस्थांनी पाठविलेली मदत उमरगा तहसीलमध्ये पडून होती. उमरग्यात संघाचे पदाधिकारी डॉ. महाजन भेटले. आंध्र, कर्नाटकातून स्वयंसेवक मदतीला येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मंगरूळला मृतदेहांचा खच
तीन ऑक्टोबरला संघाचे तत्कालिन सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री आले होते. लातूर येथील विवेकांनद रुग्णालात गेलो. तेथे पंधरा दिवसांचे अर्भक उपचार घेत होते. आई- वडील किंवा अन्य कोणी नातेवाईक सापडत नव्हते. काय म्हणावे या अर्भकाला. तर डॉक्टरांनी नाव निवेदिता ठेवले. त्यानंतर आम्ही मंगरूळ या भूकंपग्रस्त गावात गेलो. तेथे मृतदेह काढण्याचे काम चालूच होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सर्वप्रथम गावात पोहचले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. भूकंप होऊन तीन दिवस झाले होते. तरी ढिगार्याखालील अनेकजण असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज होता.
भूकंपासारखी घटना घडून पंतप्रधान का आले नाहीत, असा सवाल एव्हाना विचारला जाऊ लागला. (त्याचा खुलासा शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून लगेच येऊ नये, ही विनंती पवारांनीच केली होती.) चार तारखेला पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव लातुरात आले. त्यांनी भूकंपग्रस्त गावांची पाहणी करीत लातूर येथे जि. प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रपरिषद घेतली. पंतप्रधानांच्या दौर्यामुळे भूकंपग्रस्त भागातही कडक बंदोबस्त होता. बंदोबस्ताच्या नावाखाली लोकांना बाहेरही येऊ दिले नाही, ही सामान्य नागरिकांची तक्रार होती. राव यांना मराठी येत असल्याने एक दोन प्रश्न मराठीतही त्यांना विचारले. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करता येतील, असा त्यांच्या पत्रपरिषदेचा सूर होता.
1993 ते 2025..पाहता पाहता 32 वर्षे सरली. लातूर, धाराशिव या धक्क्यातून आता सावरले आहे. एका पिढीने भूकंप अनुभवला तर एक पिढी भूकंपाची वेदना ऐकेतेय. पुनर्वसन, रोजगार अशा अनेक समस्या अजूनही भूकंपग्रस्त भागात आहेत हे खरेच. भूकंपाच्या नैसर्गिक संकटाला तोंड देणारे लातूर, धाराशिवकर आता पूरस्थितीशी सामना करीत आहेत. नैसर्गिक संकटाबाबत शासन, जनता कधी जागरूक होणार हा प्रश्न अजूनही शिल्लक आहे.