छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातला आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ-घृष्णेश्वर, पैठण या तीर्थक्षेत्रांवरही पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. तथापि, हा आराखडा अधिक व्यापक, सूक्ष्म नियोजनयुक्त करून पुन्हा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (दि.७) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.७) नियोजन बैठक पार पडली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. कुंभमेळा काळात लाखो भाविक, पर्यटक, साधुसंत हे महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. त्यात जिल्ह्यातील वेरुळ आणि पैठण हे स्थळ महत्त्वाचे आहे. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत येतील असा अंदाज घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने परिवहन व वाहतूक व्यवस्था, मुलभूत सुविधा, भाविक पर्यटकांची सोय व राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, ऐतिहासिक स्थळांचे जतन या महत्त्वाच्या बाबी विचाराधीन करुन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
दररोज २ लाख पर्यटकांच्या हजेरीचा अंदाज
पर्यटकांचा ओघ नाशिक, त्र्यंबकेश्वरकडे असला तरी पर्यटक नजिकच्या तीर्थक्षेत्रांनाही भेटी देतील. त्यात छत्रपती संभाजीनगर, शिर्डी ही विमानतळे असल्याने येथे देश - विदेशातील पर्यटक येऊन नाशिककडे जातील. या भागातील अजिंठा, वेरुळ, छत्रपती संभाजीनगर, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, दौलताबाद किल्ला तसेच बिबी का मकबरा, नहेर ए अंबरी अशा महत्वाच्या पर्यटक स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल. महाशिवरात्री पर्वात दररोज दीड ते २ लाख पर्यटकांची हजेरी तर सिंहस्थ पर्वात ३ लाख पर्यटकांची दररोज हजेरी अपेक्षित आहे.
आराखड्याची वैशिष्ट्ये पाच ठिकाणी पार्किंग व्यवस्था
वाहनतळांसाठी १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग आणि निवास व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धुळे सोलापूर महामार्ग (समृद्धी महामार्ग लगत), धुळे सोलाप महामार्ग (कन्नड लगत), खुलताबाद रस्ता (फुलंब्री कडील बाजू), छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग-५२ लगत अशा ठिकाणी ही पार्किंग स्थळे व निवास व्यवस्था निर्माण करण्याव येईल.
भाविकांसाठी तंबू शिबिरे
स्वच्छता गृहे, स्त्री, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, माहिती केंद्र स्थापणे. शिवाय तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती करणे, अन्नक्षेत्र उभारणे हॉटेल व लॉजसाठी सल्लागा सेवा व त्यासाठी क्यूआर कोड बुकिंग सेवा.
हेलिपॅडसह सुरक्षा व्यवस्था
२४ तास निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे देखरेख, तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारणे व नियंत्रण कक्ष स्थापित करणे, महिला पोलिसांची पथके तैनात करणे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी बॅरिकेटींग, सेप्रेशन वॉल्स, सुरक्षा मार्ग इत्यादी व्यवस्था करणे. हेलिपॅड उभारणी, विश्रामगृह.