Chhatrapati Sambhajinagar Shri Khandoba Hemadpanthi Temple
छत्रपती संभाजीनगर : सौ. ज्योती संजय पाटील,
(वाळूज) ग्रंथपाल, CSMSS कृषी महाविद्यालय, कांचनवाडी )
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सातारा हे छोटेसे खेडे होते, परंतु आता ते महानगरपालिकेच्या हद्दीत आले आहे. ते छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या ८ किमी अंतरावर आहे. सातारा हे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला उंच डोंगराच्या कुशीत आणि दाट झाडीमध्ये असलेले जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री खंडोबाचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे.
येथील खंडोबा यात्रा जेजुरी प्रमाणेच लोकप्रिय आहे म्हणून याला जेजुरीचे प्रतिरूप मानतात. श्री खंडोबा दैवत जागृत, नवसाला पावणारे व सातारा परिसराला, शहराला भरभराट देणारे मानले जाते. सातारा येथे येळकोट यळकोट जय मल्हार हा जयघोष घुमायला लागला आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
अनेकविध जमातीचे श्रध्दास्थान, कुलदैवतम्हणून हे खंडोबा देवस्थान प्रसिध्द आहे. श्री खंडोबा अनेक नावांनी पूजला जातो. त्यामध्ये मैलार, मल्हारी मार्तंड, म्हाळसापती, म्हाळसाकांत ही नावे सर्व परिचित आहेत. मल्हारी मार्तंड श्री खंडोबाचे महाराष्ट्रात ६ जागृत ठिकाणे आहेत. ५ ठिकाणे हे कर्नाटकात आहेत.
भौगोलिक व ऐतिहासिक ओळख शहराच्या मुख्य बसस्थानकापासून सूमारे ११ किमी (दक्षिणेस) अंतरावर रमणीय सृष्टी सौंदर्याने नटलेल्या डोंगर पायथ्याच्या खाली मध्यम उंची स्थानी सातारा हे ठिकाण आहे. अत्यंत वैभवशाली दिवस खेडे असताना या गावाने उपभोगलेले आहेत. कारण सातारा निजाम राजवटीत जहागिरीचे मुख्य ठिकाण होते. हैदराबाद संस्थानात (बारागाव) जहागिरी असलेले सातारा गाव गावकोटात सुरक्षित होते.
दोन वेशी (तटबंदीचे मुख्य व्दार) असलेल्या सातारा गावात जहागीर वाडा, न्यायमूर्ती कचेरी आणि इतर कारभाराचे एक चौक, दोन चौक असे भव्य वाडे होते. या चिरेबंदी वाड्यांमध्ये हैदराबाद संस्थानच्या जहागिरीचा कारभार चालत असे. न्यायदानापासून टपालापर्यंत सर्व कामे येथून चालत असे. पूर्वी शके १४०० ते १५०० दरम्यान मूळ खंडोबा देवस्थान हे साताऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या मोठ्या डोंगरावर होते. हे स्थान आजच्या साताऱ्यापासून ५ किमी अंतरावर आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार लोक उंच डोंगरावर सूरक्षित ठिकाणी आपली वसाहत करत होते आणि त्याठिकाणी आपल्या आराध्य देवतांची स्थापना करत असत.
आपले आराध्य दैवत हे बहुतेक ठिकाणी डोंगरावर किंवा किल्ल्यावर असल्याचे आपल्याला दिसून येते. जिथे जिथे लोकवस्ती तिथे तिथे आपले कुलदैवत, कुलस्वामिनी यांची प्रतिष्ठापना ते लोक करत असत. त्यामुळे पूर्वीचे मुख्य खंडोबा देवस्थान हे डोंगरावर होते. आजही त्या ठिकाणी भग्नावस्थेत गवळी लोकांचे वाडे नामशेष होत चाललेले गोलाकार, चौकोनी पाया भरणीचे दगड रांगेत लावलेले दिसून येतात. अगदी डोंगरात एका टोकावर भव्य काळ्या दगडावर कोरीव काम केलेले हेमाडपंथी पूर्वाभिमुख श्रीखंडोबा मंदिर उभारलेले आहे. हे मंदिर एका चौथऱ्यावर चोहोबाजूंनी दगडीकाम केलेल्या स्वरूपाचे आहे. त्याच ठिकाणी निवासी खोल्या जमीनदोस्त झालेल्या दिसतात. फक्त मूर्तीवरील कळसाचा भाग तेवढा शिल्लक आहे. हे ऐतिहासिक मंदिर छत्रपती संभाजीनगर जवळील बोरसर येथील कुलकर्त्यांनी बांधल्याचे सांगतात. तर इ.स. १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या अपूर्ण स्थितीमुळे बांधकाम अपूर्ण राहिले की त्याची हानी झाली याची माहिती मिळत नाही.
मंदिराच्या गाभाऱ्यात एका शिळेवर घोड्यावर स्वार झालेले श्री खंडोबा दर्शविण्यात आलेले आहे. वर्षातून एकदा पौष महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सातारा गावातून पठारावर पालखी (खंडोबाची) देव भेटीला जाते. या पालखी सोहळ्यात भाविक सहभागी होतात. श्री खंडोबा मंदिरामागे साधारण ३० बाय ४० परिघात एक चिरेबंदी तळे आहे. हा अपूर्व ठेवा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. साताऱ्याच्या या डोंगरामध्ये दोन लेण्य डोंगराच्या वरच्या बाजूला सासू-सुनेचे दोन तलाव आहेत. वरच्या एक त्या जात्यातून पूर्वी भंडारा पडत असे, अशी अख्यायिका आहे.
श्री खंडोबा आणि रविवारचे महत्त्व काय आहे?
रविवार खंडोबा देवाचा वार म्हणून भाविक त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दर्शन घेण्यासाठी येतात, असे म्हणतात की महादेवाने कैलासपर्वतावर धर्मपुत्रांच्या रक्षणासाठी स्वरोचित मनूच्या १३ व्या कृतयुगाच्या समाप्तीस ८८,००० दिवस अवकाश असताना चैत्र शुध्द पौर्णिमेला दोन प्रहरी मार्तंड भैरव अवतार घेतला त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे श्री खंडोबा भक्त दर रविवारी येथे दर्शनासाठी गर्दी करतात. घरी कोटंबा पूजन करतात व वारी मागतात. नवीन लग्न झाल्यानंतर ज्या प्रमाणे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीला जातात, त्याचप्रमाणे नवदाम्पत्य सातारा खंडोबालाही दर्शन घेण्यासाठी येतात व त्याच ठिकाणी जागरण-गोंधळ घालतात.
चंपाषष्ठी म्हणजे काय?
या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुराचा वध केला तेव्हा देवांनी व गणांनी व त्रींनी देवाची पूजा चाफ्याच्या फुलांनी केली व तो दिवस षष्ठीचा होता. म्हणून त्याला चंपाषष्ठी असे म्हणतात. चंपाषष्ठीला गावात देवाची मिरवणूक काढली जाते. सर्व गावकरी त्यावेळी देवांची पूजा करतात. संध्याकाळी देव पुन्हा देवळात येतात. चंपाषष्ठीला देव जहांगीरदार (दीक्षित) यांच्या वाड्यात येतात. दीक्षितांचे वंशज दांडेकर परिवार परंपरेनुसार रुद्राभिषेक करून खंडेरायाला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवतात व संध्याकाळी देव परत देवळात येतात. विजयादशमीलाही देवाची पालखी गावशिवारात मिरविली जाते. हा सो-हळा पाहण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील भाविक गर्दी करतात. चंपाषष्ठीला राक्षसांवर भगवंतांनी विजय मिळवला याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खंडेरायाचे ६ दिवसांचे नवरात्र बसवून मंदिरात व घरी उत्सव साजरा करतात. शेवटच्या दिवशी देव सीमोल्लंघन करतात.