छत्रपती संभाजीनगर

करमाड हादरले! प्रियकराचे क्रूर कृत्य; पेट्रोल पंपावर काम करताना महिलेची गळा चिरून हत्या

पुढारी वृत्तसेवा

करमाड : येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भयानक घटना घडली. आपल्या कामात व्यस्त असलेल्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चितेपिंपळगाव, ह.मु. कुंभेफळ) या महिलेचा तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे (रा. चितेपिंपळगाव) याने चाकूने गळा चिरून निघृण खून केला. या हल्ल्यात पूजा यांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भरदिवसा पंपावर रक्ताचा सडा

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर आपले कर्तव्य बजावत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी सत्यम गावंडे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही काळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने जवळ असलेला तीक्ष्ण चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर वार केले. गळा चिरला गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन पूजा यांचा जागीच प्राण गेला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कर्मचारी भयबीत झाले आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार शिवाजी मादेवाड, विनोद खिल्लारे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय असून, पोलिसांनी आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या खुनामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT