Kannada police raid illegal cattle slaughterhouse at midnight
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातीलबिस्मिल्ला कॉलनी परिसरातील एका राहत्या घरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत ५० किलो गोवंशाचे मांस व कत्तलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले असून, दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास कन्नड शहर पोलिस ठाण्याचे पथक नाईट पेट्रोलिंग करीत असताना बिस्मिल्ला कॉलनीतील एका घरात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे व त्यांच्या पथकाने खासगी व शासकीय वाहनांच्या सहाय्याने रात्री ११.५० वाजता संबंधित घरावर छापा टाकला. पोलिसांनी घराची यावेळी तपासणी केली.
छाप्यादरम्यान दोन जण घरात गोवंशाचे मांस कापताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जमील अमीन शेख (३०) व समीर अमीन शेख (३२, दोघे रा. बिस्मिल्ला कॉलनी, कन्नड) अशी सांगितली. तसेच हे मांस विक्रीसाठी तयार केल्याची कबुलीही त्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मांसाची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत ते गोवंशीय जनावराचे मांस असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे १० हजार रुपये किमतीचे ५० किलो गोवंशाचे मांस तसेच १०० रुपयांचे दोन लोखंडी चाकू असा एकूण १० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर कारवाया वाढवल्या आहेत.
जप्त केलेले नाशवंत मांस केले नष्ट
जप्त केलेले नाशवंत मांस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन बहिरगाव फाटा येथील डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली. पोस अंमलदार सागर नारायण सुलाने यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.