Kalpana Bhagwat Case Fourth accused arrested in bogus IAS case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात सिडको पोलिसांनी चौथ्या आरोपीला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून शनिवारी (दि.६) जेरबंद केले. दत्तात्रय पांडुरंग शेटे (३८, रा. मांडवगन) असे आरोपीचे नाव आहे.
शनिवारी कल्पना भागवतची पोलिस कोठडी संपत असल्याने तिला आणि शेटेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने भागवतला न्यायालयीन कोठडी तर शेटे याला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बनावट आयएएस कल्पना भागवतला काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्यानंतर तिचा अफगाणी प्रियकर अशरफ खिल आणि गृह मंत्रालयातील कथित बनावट ओएसडी डिम्पी हरजाई यांना दिल्लीहून ताब्यात घेण्यात आले.
तपासात अशरफचा भाऊ पाकिस्तानात राहत असल्याचेही समोर आले. आयवी व एटीएसनेही कल्पनाची चौकशी केली; मात्र तिचा कोणताही देशविघातक दुवा आढळून आला नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान कल्पना भागवतच्या ताब्यातून सापडलेल्या बनावट आयएएस यादीच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर चौकशीत कल्पनाने उघड केले की, तिची ओळख दत्तात्रय शेटे याच्याशी झाली होती.
त्याने तुला आयएएस बनवतो असे सांगत विश्वास संपादन केला. पुढे शेटेने कल्पनाची ओळख मनोज लोढा याच्याशी करून दिली. या दोघांनी मिळून बनावट आयएएसची यादी तयार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तपासाला तेरा दिवस उलटूनही पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. सर्व आर्थिक व्यवहार थेट बँक खात्यातून झाले असून, कल्पनाचा देशविघातक कारवायांशी संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. पूर्ण तपासच गोंधळलेला असून पोलिस अडखळत असल्याचा आरोप अॅड. अभयसिंह भोसले यांनी केला.
आरोपी लुंगीवरच न्यायालयात : पोलिसांची धावपळ
तोतया आएएस प्रकरणात अटक असलेल्या आरोपींना शनिवारी (दि.६) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान त्यातील एका आरोपीला पोलिसांनी लुंगीवरच न्यायालयात आणले होते. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला एक नवीन पँट व शर्ट आणून देत त्याला न्यायालयासमोर उभे केले.