पैठण: पैठण, नाशिकसह भंडारदारा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी पाटबंधारे विभागाने धरणाचे १८ दरवाजे ४ फुटांनी उघडले असून, गोदावरी नदीत ७५,४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत धरणात २८,६११ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. कार्यकारी अभियंता प्रशांत संत आणि धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढवला. या वाढलेल्या विसर्गामुळे पैठण तालुक्यातील गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची अवजारे आणि पाण्याचे पंप काढून घेतले आहेत. त्यामुळे पाणी असूनही पिकांना आणि फळबागांना पाणी देणे कठीण झाले आहे.
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अशा परिस्थितीत वरच्या भागातून आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पूर येण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल विभागाकडून आपत्कालीन आढावा बैठक घेणे अपेक्षित असते, मात्र येथील तहसील कार्यालयाकडून अशी कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही, असा प्रकार समोर आला आहे. गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये काम करणारे महसूल अधिकारी, तलाठी आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी आणि नागरिकांना पाण्याचा विसर्ग झाल्याची अधिकृत माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.