Jayakwadi Dam : आवक मंदावल्याने १८ दरवाजे बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam : आवक मंदावल्याने १८ दरवाजे बंद

जायकवाडी धरणात ९३.३८ टक्के पाणी, २ लाख हेक्टर क्षेत्राला होणार फायदा

पुढारी वृत्तसेवा

Jayakwadi Dam: 18 gates closed as inflow slows down

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील जायकवाडी धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग १८ दरवाजे बंद करून पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या वरील भागातून येणारी पाण्याची आवक मंदावल्याने धरण नियंत्रण पथकाने दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक बुधवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजेदरम्यान २ हजार क्यूसेक सुरू होती. धरणात पाण्याची टक्केवारी २३.३८ ठेवण्यात आली आहे. ४ ऑगस्टपासून येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. २७ पैकी १८ दरवाजांमधून तब्बल १६३.९२२८ दलघमी म्हणजेच ५.७९ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आला होता, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.

सध्या जायकवाडी धरणात २७६६.४९४ दलघमी एकूण पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी २०२८.३८८ दलघमी जिवंत साठा आहे. धरणाची पाणीपातळी १५२०.८० फुटांवर ४६३.५४० मीटर पोहोचली असून, धरण ९३.४३ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवशी धरण ९२.०५ टक्के धरण भरलेले होते. सध्या धरणात ४,४४१ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून पैठण उजव्या आणि डाव्या कालव्यातून प्रत्येकी १,३०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातून शेतीसाठी ७पाण्याच्या पाळ्या देणे शक्य होणार आहे.

गतवर्षी १२ ऑगस्ट रोजी धरणात ९२.०५ टक्के पाणीसाठा होता. तर यंदा १० दिवसांत ६० टक्के पाणीसाठा वाढला आहे. या पाण्यामुळे यंदाच्या हंगामात पिकांना किमान ७पाणी पाळ्या देणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्राला पाण्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करून सर्व घटकांना वर्षभर पुरेसे पाणी मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना आमदार विलास भुमरे यांनी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना केली आहे.

१६ बंधारे तुडुंब; शेतीसह पिण्याच्या पण्याचा प्रश्न सुटला

जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना संजीवनी मिळाली आहे. आपेगाव व हिरडपुरी येथील मोठे बंधारे १०० टक्के भरले असून, त्याखालील अन्य १४ बंधाऱ्यांमध्येही मुबलक पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न मिटला असून, यासह जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ५ हजारांहून अधिक उद्योगांचा पाण्याचा आधार बळकट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराला ५०० दिवस पुरेल एवढे पाणी सहा दिवसांत गोदावरी नदीत सोडण्यात आलेले पाणी हे ५.७९ टीएमसी इतके आहे. या पाण्यातून छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक वसाहतीला वापरासाठी सलग ५०० दिवस पाणीपुरवठा करता आला असता, असे मत पाणी तज्ज्ञांनी व्यक्त केले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT