Jan Shatabdi to run under the 'Express' category starting January 1st
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली जनशताब्दी आतापर्यंत सुपर एक्स्प्रेस म्हणून धावत होती. दरम्यान १ जानेवारीपासून ही गाडी केवळ एक्स्प्रेसच्या श्रेणीत धावणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामांन्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांच्या श्रेणीत बदल करण्यात आला आहे. १ जानेवारी पासून या गाड्या सुपरफास्टऐवजी नॉन-सुपरफास्ट श्रेणीत धावणार आहेत. त्यानुसार दोन्ही गाड्यांचे क्रमांकही बदलण्यात आले आहेत. मुंबई- हिंगोलीकडे जनशताब्दी एक्स्प्रेसचा जुना क्रमांक-१२०७१ असून, तो बदलून ११०६९ करण्यात आला आहे. तर हिंगोली- मुंबईचा जुना क्रमांक १२०७२ होता. नवीन क्रमांक ११०७० असेल. हा बदल १ जानेवारीपासून लागू होणार आहे. मात्र, दोन्ही गाड्यांचे सध्याचे निर्धारित थांबे कायम राहणार आहेत.
ही गाडी सुपरफास्ट असल्याने विना आरक्षण प्रवास करता येत नव्हता. दरम्यान या गाडीचा वेग ताशी ५५ किलोमीटरच्या आसपासच असल्याने सुपरफास्ट गाडीची मानके पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे सुपर फास्टचा दर्जा काढून एक्स्प्रेसची श्रेणी ठेवण्यात आली आहे. या श्रेणीमुळे सर्वसामांन्य प्रवाशांना लाभ मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगरहून मूबंईला जाण्यांसाठी रात्री ११: ३० नंतर तब्बल १० तास रेल्वे नाही. तरी पुर्वी सूरू असलेली जनशब्दादी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून सुरू करावी.- जितेन्द्र भवरे, वंचित बहुजन आघाडी, माजी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख