छत्रपती संभाजीनगर : प्रमोद अडसुळे
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, शहरात ट्रॅव्हल्ससह अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री अकरा यावेळेत प्रवेश बंदी आहे. मात्र या आदेशाला त्यांचेच वाहतूक पोलिसांनी हरताळ फासला आहे. सिडको उड्डाणपुलाजवळ भररस्त्यावर ट्रॅव्हलसवाल्यांनी अनधिकृत थांबाच केला असून, त्याला टेबलाखालून मूकसंमती दिली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील दोन लेन अडवून ठेवत असल्याने सायंकाळी साडेसात वाजेनंतर मोठी वाहतूक कोंडी होते. अपघाताचा धोका निर्माण करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. काही दिवसांपूर्वी सुसाट ट्रॅव्हल्सने कुंभेफळजवळ दोन विद्यार्थिनींचा चिरडून जीव घेतला. शहरातही सुसाट धावणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो आहे.
शहराचा प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोडवर दररोज सकाळी कार्यालयात जाणारे आणि सायंकाळी घराकडे परतणाऱ्या शहरवासीयांची, शाळकरी विद्यार्थी, स्कूलबस, दुचाकीस्वार, महिला, पुरुष यासह अन्य छोट्या वाहनांची मोठी वर्दळ असते. यापूर्वी अवजड वाहनांमुळे अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अवजड वाहने शहरात प्रवेशबंदी केल्यापासून बराच फरक पडला होता. मात्र पुन्हा ट्रॅव्हल्स शहरात मोकाटपणे फिरत आहेत. दर्गा चौकातून गजानन मंदिर, सेव्हनहिलमार्गे सिडको तर काही ट्रॅव्हलस महावीर चौकातून जालना रोडने वसंतराव नाईक चौक, सिडकोपर्यंत सुसाट वेगात धावतात. जालना रोडवर रात्री कामावरून घराकडे परतणारे अधिक असल्याने वाहनांची अत्यंत वर्दळ असते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावत असल्याने असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. सिडको चौकाजवळ अनधिकृत ट्रॅव्हल्स थांबा जीवघेणा ठरत आहे.
शहरातील ट्रॅव्हल्ससाठी 1 1 महावीर चौक, पंचवटी चौक आणि दर्गा चौक या तीन ठिकाणी पार्किंग आणि थांब दिलेले आहेत. त्यांना सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत शहरात प्रवेश करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्तांचे आहेत. यासह वीट, वाळू किंवा अन्य साहित्य वाहतूक करणारे अवजड वाहनांना देखील या वेळेत प्रवेश बंदी आहे. मात्र वाहतूक शाखेत मनुष्यबळ तुटपुंजे असल्याने दिवसा कर्तव्य बजावून सायंकाळी सात वाजेनंतर रस्त्यावर वाहतूक पोलिस दिसत नाहीत.