छत्रपती संभाजीनगर : 'छावा' चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजीराजेंना विचारतो, ..अब कहाँ है तुम्हारा स्वराज?'..राजे उत्तर देतात..'सह्याद्री के पहाडो में, गोदावरी की लहरो में, रायगड की मिट्टी में, जालना की गलीयोमें..' छावा सारख्या ऐतिहासिक आणि देशभरात सध्या टाॕपवर असलेल्या चित्रपटात मराठवाड्यातील जालन्याचे नाव ऐकून रोमांच उभे राहतात. साहजिकच छावा आणि जालन्याचे काय संबंध आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो. स्टील उद्योग, बियाणांची राजधानी, सोन्याची बाजारपेठ म्हणून गेल्या ३०/४० वर्षापासून प्रसिध्द असलेल्या जालन्याचे ऐतिहासिक महत्व अभ्यासले असता वाचकांनाही भूरळ पडावी अशी माहिती मिळते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोन वेळा लूट केल्याचा इतिहास आहे. तशीच लूट जालन्याची केली होती,असे उल्लेख सापडतात. इतिहासाचे अभ्यासक प्रा. डाॕ. वि. ल. धारुरकर आणि पुरातत्व खात्यामधील संशोधक अधिकारी डाॕ. कामाजी डक यांनी त्यास दुजोरा दिला.
शिवरायांच्या काळात जालन्याचे नाव जालनापूर असे होते. महानुभाव साहित्यात जालनापूरऐवजी हिरवळ अशी या गावाची नोंद आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली होती. १६७८ मध्ये मुघल व आदिलशाही सैन्य एक झाले. मुघलांनी स्वराज्यावर हल्ला केला व एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकून घेतला.
यानंतर झालेल्या घडामोडीत मसूद खानाने महाराजांना विजापूर वाचविण्याची विनंती केली. महाराजांनी आपले वकील बोलणीसाठी विजापूरला पाठवले व नंतर विजापूरच्या संरक्षणासाठी सैन्य व रसद पाठवली. मुघलांना अटकाव करण्यासाठी मराठे, आदिलशाही आणि कुतुबशाही या दक्षिणेतल्या सत्ता मुघलांविरुद्ध सज्ज झाल्या.
ऑक्टोबर १६७९च्या अखेरीस महाराज स्वतः मोरोपंत पेशव्यांसह विजापूरजवळ पोहोचले. महाराजांना आदिलशहाची भेट घेण्याची इच्छा होती. पण मसूद खानाचा भरवसा नसल्याने महाराजांनी त्यांची भेट घेऊ नये अशी विनंती मोरोपंतांनी केली. या वेळी महाराजांनी रणनीती बदलून मुघलांच्या ताब्यातील मोठ्या बाजारपेठांकडे मोर्चा वळविला.
जालना ही बालाघाटातील व्यापाऱ्यांची प्रमुख बाजारपेठ होती. अनेक श्रीमंत व्यापारी तेथे राहत असत. मराठ्यांनी साधारण १६ नोव्हेंबरपासून जालना पेठ लुटायला सुरुवात केली व चार दिवस ते पेठ लुटत राहिले. या लुटीत त्यांना सोने, चांदी, हत्ती, घोडे तसेच इतर संपत्ती मोठ्या प्रमाणात मिळाली. लुट घेऊन २२ नोव्हेंबर रोजी महाराज सैन्यासह जालन्याहून पट्टा (विश्रामगड) गडाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच रणमस्तखान, आसिफखान, जाबीतखान व आणखी पाच-सात उमराव व ८-१० हजार फौजांशी यांची गाठ पडली. यावेळी मोठी लढाई झाली. बहिर्जी नाईकांनी यातून महाराजांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि शिवाजी महाराज, मोरोपंत पेशवे काही सैन्यासह पट्टा गडावर पोहोचले. ही लढाई पुढे दोन-तीन दिवस चालली व त्यात सिधोजी निंबाळकर यांना वीरमरण आले. जालन्याची लूट आणि पट्टा गडाची लढाई शेवटची ठरली.डिसेंबर अखेरीस महाराज रायगडावर परतले. यानंतर पुढील ३ महिन्यांनी त्यांचे निधन झाले. महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्याचा चंग बांधला. त्यावेळी त्यांचे जालना, नाशिक, कोल्हापूरकडे लक्ष होते.
जालना हे पूर्वीपासूनच भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे स्थान राहिले आहे. याशिवाय व्यापारी पेठ म्हणून जालन्याची ओळख आहे. औरंगजेबाचेही जालन्याकडे लक्ष होते. त्यामुळेच मलिक अंबरला त्याने काही सुधारणा करण्यासाठी जालन्यात पाठविले होते. निझाम राजवटीत जालन्यात तलाव व अन्य काही सुधारणा झाला. दक्षिणेतील जालन्याचे असलेले स्थान, छावा कादंबरीत झालेल्या लुटीच्या उल्लेखामुळे छावा चित्रपटातही जालना झळकले.