पैठण : केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या हर घर जल योजना कार्यान्वित होण्याची डेड लाईन होऊनही पैठण तालुक्यातील नागरिकांना पाणी मिळाले नाही.त्यामुळे ही योजना पूर्णत्वाकडे कधी जाते अशी भावना व्यक्त होत आहे. या योजनेचे काम संथगतीने होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घरघर लागली आहे.
50 टक्क्यांपेक्षा अधिक कामे अर्धवट स्थितीत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारने हर घर नल योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी सरकार प्रत्येक घरात नळ कनेक्शनदेणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचे 2024 चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
पैठण तालुक्यातील 188गावांमध्ये या योजनेंतर्गत कामे करण्यात येणार आहे.त्यासाठी जवळपास 275 कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. मात्र दोन वर्ष लोटूनही पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातीलबहुतांश गावांमधील कामांकडे कानाडोळा केल्याची ओरड जनतेकडून होता आहे.
जलजीवन मिशनची कामे एक ना धड भाराभर चिंध्या अशी स्थिती आहे. यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक कामे अर्धवट स्थितीत आहे. 04 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, 1 88 मंजूर गावांपैकी योजनांपैकी एकही गावांची कामे पूर्ण झाली नाहीत तसेच 2025 हे वर्ष देखील उलटले. त्यामुळे गावे अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कामांचा आढावा घेण्याची गरज
कंत्राटदारांच्या कामाची पाहणी आणि पाणीपुरवठा अभियंत्याकडून होत असलेले दुर्लक्ष याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास जलजीवन मिशन कामाची पोलखोल समोर येणार असल्याचे दिसून येत आहे. ही योजना लवकर पूर्ण होऊन नागरिकांना शुध्द पाणी प्यायला मिळाले पाहिजे यासाठी तत्कालीन रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी कामांची गुणवत्ता व दर्जासंदर्भात सूचना दिल्या.
या सूचनांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतील तर यापेक्षा विदारक चित्र कुठले असावे, असा प्रश्न आता जनसामान्यांतून उपस्थित होत आणि अधिकाऱ्यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्यामुळे जलजीवन मिशनच्या कामात दुर्लक्षपणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी पैठण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला पाहिजे . संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून कामे त्वरित करण्यात यावी तसेच पैठण तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने अधिकाऱ्यांना आदेशीत करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घरोघरी नळाव्दारे पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे.
स्वच्छ आणि शुध्द मुबलक पाणीपुरवठा घरोघरी व्हावा हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे.
प्रतिमाणसी किमान 55 लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यायचे आहे.करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
23डिसेंबर 2024 अखेर या अभियानातील सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. पण ठेकेदारांची अकार्यक्षमता, तांत्रिक अडचणी या कारणामुळे योजनेंतर्गत मंजूर कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.