कन्नड : तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी परीक्षा केंद्र संचालकासह एकूण २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मंगळवारी (दि.१०) दुपारी १.२० वाजता सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या केंद्रावर ३३१ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी ३२७ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा १४ वर्गखोल्यांमध्ये सुरू होती. तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांकडे मोबाईलमध्ये सोडवलेली उत्तरे तसेच हस्तलिखित स्वरूपातील ९ झेरॉक्स प्रती आढळून आल्या. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासणीमध्ये काही पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
काही विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल केल्याचेही निदर्शनास आले.या प्रकरणाची सखोल चौकशी करून परीक्षा केंद्रावरील २४ कर्मचाऱ्यांविरुद्ध देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथील १३, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, हतनूर येथील ५, न्यू हायस्कूल देभेगाव येथील २ तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२७ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे विभागीय परीक्षा मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बंधनकारक ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.