छत्रपती संभाजीनगर : जाफराबाद तालुक्यातील माहोरा भागात अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सकाळी सहा वाजता रुग्णालयाने एमएलसी क्रांती चौक पोलिसांना कळविली. मात्र पोलिस येत नसल्याने नातेवाइकांनी धाव घेऊन विनंती केली. मात्र क्रांती चौक पोलिसांच्या आडमुठ्या कारभाराने पंचनामा करण्यासाठी तब्बल सात तास लागले. वरिष्ठांनी कानउघाडणी केल्याने दुपारी दोन वाजता पंचनाम्याला पोलिस आले. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
वरूड खुर्द (ता. जाफराबाद) येथील रामेश्वर जगन गाढे (४७) यांचा रविवारी दुचाकीवरून जात असताना माहोरा परिसरात अपघातात झाल्याने गंभीर अवस्थेत त्यांना शहरातील महावीर चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयाने सकाळीच एमएलसी नोंदवून पोलिसांना माहिती दिली होती. परंतु दुपारी दोन वाजेपर्यंत पोलिस आले नाही. नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत वारंवार विनंती केली; तरीही मृतदेह पोस्टमर्टमला हलविण्यास दिरंगाई झाली. परिणामी दुपारी एक वाजता संध्याकाळपर्यंत होऊ शकला नाही. नियोजित अंत्यविधी दूरवरून आलेले अनेक नातेवाइकांना परत जावे लागले.
या एमएलसीची चौकशी एका महिला अधिकाऱ्याकडे देण्यात आली होती. मात्र वरिष्ठांनी कामाचा बोजा वाढविल्याच्या कारणावरून त्यांनी हेतुपुरस्सर जबाबदारी टाळल्याचे समोर आले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर दुपारी दोन वाजता पोलिस रुग्णालयात दाखल झाले. पण तोपर्यंत मृतदेहाची अनावश्यक हेळसांड झालेली होती.
शहरात व्हीव्हीआयपी दौरा असल्याने सर्व बंदोबस्त तिकडे लावण्यात आला होता. त्यामुळेही काही अडचणी आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले. मात्र व्हीव्हीआयपीपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना दुय्यम वागणूक देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक गोष्ट वरिष्ठांकडे गेल्यानंतरच होणार का, हाही एक मुद्दा वारंवार काही पोलिस ठाण्यांच्या कारभारावरून दिसून येत आहे.