छत्रपती संभाजीनगर : प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जाधववाडीतील सनी सेंटरमागे कारवाई करून वर्ग २ च्या जागेवरील तब्बल ८१० प्लॉटची अवैध प्लॉटिंग निष्कासित केली. अन् ही कारवाई होताच श्री रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येत आमच्या जागेत कोणीतरी प्लॉटिंग करून विकल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात या जागेत काँक्रीट रस्ते आणि प्लॉटिंग पाडून ते विक्री केले जात होते. तेव्हा ट्रस्टचे हेच पदाधिकारी कुठे होते, असा सवाल उपस्थित होत असून ट्रस्टींच्या भूमिकेवरच संशय निर्माण होत आहे.
महापालिका हद्दीत नवीन मोंढा परिसरात तब्बल ४१ एकर जागा किराडपुरा येथील श्रीराम मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टच्या मालकीची आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा डोळा आहे. याच जागेत दोन ते अडीच वर्षांपूर्वी प्रदीप शर्मा यांचे भव्य शिव महापुराण कथेचे कार्यक्रम झाले. त्याअगोदरपासूनच या जागेत काहींनी कॉक्रीट रस्ते आणि प्लॉटिंग पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती.
या जागेचा प्रकार बदलण्यासाठी म्हणजेच एनए करण्याची तयारी देखील झाली होती. परंतु, जागा खितमतमासची असल्याने तशी परवानगी देण्याचे अधिकार महसूल विभागाला नाही. त्यामुळे प्रकरण अभिप्रयासाठी पाठविण्यात आले होते. त्यात अद्याप कुठलाच निर्णय झाला नसल्याने प्रस्ताव थंड बस्त्यात पडून आहे.
दरम्यान, रामानंद बिल्डर्स अँड लँड डेव्हलोपर्सचे मुकुंद कुलकर्णी यांनी जागेचा विकास केला. तसेच प्लॉटिंग पाडून आणि कॉक्रीट रस्ते तयार करून विक्री सुरू केली होती. अनेकांनी मोक्याच्या ठिकाणी प्लॉट मिळत असल्याने खरेदीस सुरुवात केली. केवळ वर्षभरात येथील तब्बल ७० प्लॉट प्लॉट विक्री झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी-विक्रीचे इसार १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर झाले आहेत.
विशेष म्हणजे महापालिकेच्या कारवाईनंतर जसे मंदिर ट्रस्टी पुढे आले. तसे मंदिर ट्रस्टच्या जागेत रस्ते आणि प्लॉटिंग काढून त्याची विक्री होत असताना ट्रस्टचे पदाधिकारी का पुढे आले नाही. त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याच वेळी का तक्रार दिली नाही. ट्रस्टचे अध्यक्ष आणि सचिवांसह इतर पदाधिकारी का शांत बसले. अन् आता मनपाच्या कारवाईनंतर ट्रस्ट्री पुढे येऊन आमचा प्लॉटिंगशी काहीच संबंध नसल्याचा दावा करीत आहे. ट्रस्टींचा हा खुलासाच संशयास्पद आहे.
ट्रस्टी दयाराम बसैय्ये काय म्हणाले
प्रश्न : मठाच्या जागेत अवैध प्लॉटिंग झाल्याची तक्रार दिली होती का ?
बसैय्ये : ते आमच्या अध्यक्षांना माहिती आहे.परंतु, तक्रार कोणाबद्दल द्यायला पाहिजे होती.
प्रश्न : तुमचे अध्यक्ष कोण आहेत ?
बसैय्ये : आमच्या मठाचे अध्यक्ष मानसिंग पवार हे आहेत.
प्रश्न : या मठाच्या जागेत अवैध प्लॉटिंग झाली,रस्ते तयार झाले तेव्हा तुम्ही कुठे होता ?
बसैय्ये : मठाच्या जागेत प्लॉटिंग कुठे दिसते,कोण म्हणते त्या जागेत प्लॉट काढले होते. त्यात
जागेत प्लॉटिंग झालेलीच नाही.
प्रश्न : मनपाने तर याच जागेवरील अवैध प्लॉटिंग काढल्याचा दावा केलाय ?
बसैय्ये : आहो महापालिकेचे अधिकारी आमच्या कंपाउंडमध्ये आले. तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न केला की, आमच्या कंपाउंडमध्ये का आलात. ते म्हणाले की, येथे अवैध प्लॉटिंग आणि रस्ते तयार झाल्याची तक्रार होती. ते काढण्यासाठी आलोय.
प्रश्न : मग त्यांनी या जागेतील रस्ते कसे निष्कासित केले ?
बसैय्ये : आम्हीदेखील त्यांना प्रश्न केला की,आमच्या जागेतील रस्ते तुम्ही कसे तोडले.
प्रश्न : मनपाच्या या कारवाईविरोधात तुम्ही तक्रार देणार का ?
बसैय्ये : बसैय्ये यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले.
श्री रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टकडून एनएच्या एनओसीसाठी अर्ज प्राप्त झाला होता. परंतु, ही जागा खितमतमास प्रकारात मोडते. त्यामुळे या जागेच्या एनएला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देता येत नाही. त्यामुळे शासनाकडे अभिप्राय मागविला होता. परंतु, अद्याप तो प्राप्त झाला नाही. तसेच जागेत अवैध प्लॉटिंग करून कोणी विक्री करीत असल्याबाबतची तक्रार मागील वर्षभरात प्रशासनाला प्राप्त झालेली नाही.संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी, सामन्य प्रशासन