Irresponsibility of 108 ambulance service
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा येथील १०८ रुग्णवाहिका सेवेतील निष्क्रियता आणि तांत्रिक बिघाडामुळे एका वृद्ध रुग्णाला तब्बल सहा तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१) रात्री साडेदहा वाजेपासून ते रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत घडली. अजिंठा ग्रामीण रुग्णालयातून निवृत्त झालेले आरोग्य सहाय्यक अब्दुल सत्तार अब्दुल रहमान (८५) हेच या व्यवस्थेतील प्रभावित ठरले. उपचारासाठी त्यांना तब्बल नऊ तास प्रतीक्षा करावी लागली.
शनिवारी रात्री आरोग्य सहाय्यक अब्दुल सत्तार अब्दुल रहमान यांना अचानक श्वसनास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलाने त्यांना तातडीने रात्री साडेदहा वाजता अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीधर बोंडले यांनी तात्काळ उपचार सुरू केले; परंतु स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
रुग्णाच्या नातेवाइकांनी खासगी वाहनाने नेण्याची तयारी दाखवली होती, परंतु रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावल्याने व सतत ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने रुग्णवाहिकेशिवाय हलविणे धोकादायक होते. परंतु अजिंठा येथील १०८ ची रुग्णवाहिका चार दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे १०८ हेल्पलाइनवरून फुलंब्री येथील रुग्णवाहिका मागविण्यात आली. मात्र ती तीन तासांनंतर आली आणि अजिंठा बसस्थानकाजवळ आल्यानंतर तिचे वायरिंग जळाल्याने तीही बंद पडली.
नंतर आळंद येथील रुग्णवाहिका मागविण्यात आली, पण चालकाने येण्याचे सांगून फोन स्विच ऑफ केला. शेवटी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका छत्रपती संभाजीनगरहून येताना अजिंठा येथे रविवारी पहाटे साडेचार वाजता पाठविण्यात आली. दरम्यान, डॉ. बोंडले, पारिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा तास कार्यतत्परता दाखवत रुग्णाला सतत ऑक्सिजन देऊन योग्य उपचार सुरू ठेवले. त्यानंतर अजिंठ्याहून रुग्णाला घेऊन जात असताना सिल्लोडची रुग्णवाहिका आळंद येथे नादुरुस्त झाली.
अखेर तब्बल नऊ तासांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णाला सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर व औषधोपचान दिल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली विशेष म्हणजे, हेच आरोग्य सहाय्यक अब्दुल सत्तार अब्दुल रहमान अजिंठ ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सहाय्यक म्हणून १९९८ साली निवृत्त झालेले असून, त्यांनाच रुग्णवाहिकेसाठ इतकी प्रतीक्षा करावी लागली, ही बाब प्रशासनाच्या व १०८ व्यवस्थापनाच्य उदासीनतेचे ज्वलंत उदाहरण ठरली.
रुग्णवाहिका चालकांची टोलवाटोलवी
अजिंठा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका नादुरुस्त, फुलंब्रीची रुग्णवाहिका अजिंठ्यात येऊनच बंद पडली आणि आळंद येथील चालकाने फोन बंद करून येण्यास नकार दिला. विशेषतः सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका आळंद येथे नादुरुस्त होणे ही संपूर्ण साखळी घटना १०८ रुग्णवाहिका व्यवस्थेतील तांत्रिक बिघाड, समन्वयाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचे स्पष्ट चित्र दर्शवते.