Investment of a staggering ₹4,930 crore in Shendra-Bidkin
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऑरिकच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रांमध्ये विविध प्रमुख कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. येथील २२९.१७ एकर जमिनीवर विविध क्षेत्रांतील १४ कंपन्यांनी तब्बल ४ हजार ९३०.५१ कोटींची गुंतवणूक केली असून, या माध्यमातून ४,९०९ जणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे येथील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
बिडकीन आणि शेंद्रा एमएसएमई पार्कमध्ये अनुक्रमे ४३ कोटी आणि १६ कोटींची गुंतवणूक झाली असून, स्थानिक लहान-मध्यम उद्योगांना मोठी उभारी मिळाली आहे. गोदावरी पॉवर अँड इस्पात लि. या कंपनीने सर्वाधिक १,५०० कोटींची गुंतवणूक केली असून ३१.४५ एकर जागेवर प्रकल्प उभारला जात आहे.
जेएसडब्ल्यू मोटर्सने इंडस्ट्रियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही विभागांत मिळून एकूण १०९.९१ एकर जागेवर १,१५० कोटींची संयुक्त गुंतवणूक केली असून ७७० तरुणांना रोजगार मिळणार आहे. तर धूत ट्रान्समिशनने शेंद्रा व बिडकीन दोन्ही टप्प्यांत मिळून ८०० कोटींची गुंतवणूक करत ७३० रोजगारांची सोय केली आहे.
सौर ऊर्जा क्षेत्रातील 'साईश्री सोलर सोल्युशन' ७१.१४ कोटी आणि 'फायटोमॅक्स न्यूट्रिशन' १८७ कोटी यांसारख्या कंपन्यांमुळे या भागात हरित व आधुनिक उद्योगांची नवी दिशा ठरत आहे. या उद्योगांसोबतच बिडकीन ४ एकर जागेवर एमएसएमई ४३ कोटींची गुंतवणूक केली आहे. यातून १४७ जणांना रोजगार मिळणार आहे. तर शेंद्रा येथील २ एकर जागेवर १६ कोटीच्या गुंतवणूकीतून १२० रोजगारांच्या संधी निर्माण होत आहे. दोन्ही मिळून २६७ रोजगार मिळणार आहे.