Internal squabbles in the NCP Ajit Pawar group even before the campaigning begins
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. पक्षाने शहरातील तब्बल ७८ जागांवर उमेदवार उभे केले असले, तरी अनेक प्रभागांत स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिल्याने पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे प्रचार सुरू होऊनही अनेक ठिकाणी उमेदवारांचा प्रचार अक्षरशः जागेवरच थांबला आहे. त्यात अद्याप पक्षाचा जाहीरनामाच ठरत नसल्याने प्रचार कोणत्या मुद्यावर करावा, असा सवाल उमेदवारांसह समर्थकांना पडला आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रतिस्पर्धी इतर पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र अजित पवार गटात उमेदवारी वाटपावरून पक्षात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या नाराजीचा थेट फटका प्रचार यंत्रणेला बसताना दिसत आहे. निवडणूक प्रचाराची वेळ जवळ येऊनही अनेक प्रभागांत बूथ कमिट्या निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.
तसेच प्रचार फेऱ्या, बैठकांचे नियोजन, घरोघरी संपर्कही ठप्प असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याची उघडपणे भूमिका घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले, मात्र तिकीट दुसऱ्यालाच, अशी भावना अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दाटून आली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत असंतोष केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नसून, त्याला धोरणात्मक गोंधळाचीही किनार असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून अजित पवार गटाकडून अद्यापही अधिकृत जाहीरनामा समोर आलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, झोपडपट्टी पुनर्विकास, रोजगार यावर पक्षाची ठोस भूमिका काय हे स्पष्ट झालेले नाही. त्यावरून उमेदवार व कार्यकर्ते प्रचार करताना नेमके कोणते मुद्दे मांडावेत, याबाबत संभ्रमात आहेत. तसेच जाहीरनामा नसताना मतदारांसमोर कोणता मुद्दा मांडावा असा सवाल अनेक उमेदवार आणि समर्थक खासगीत उपस्थित करत आहेत.
दरम्यान विरोधी पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गटातील ही अंतर्गत विस्कळीत अवस्था पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून नाराजी दूर प्रयत्न सुरू असून, त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र वेळेचे गणित पाहता हे प्रयत्न कितपत परिणामकारक ठरतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
शहराच्या पाणीप्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप
महायुतीने गेल्या तीन निवडणुका शहराच्या पाणीप्रश्नावरच लढवल्या आहेत. पुढील महिनाभरात शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे युतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र हा प्रश्न आणखी दोन वर्षे सुटणार नसल्याचा दावा रविवारी (दि.४) अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केला आहे. मात्र वर्षभरात पाणी देण्याचे फलक राष्ट्रवादीकडून शहरभर लावण्यात आले आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, राज्याच्या सत्तेत सहभागी अस-लेली राष्ट्रवादी शहरात युतीच्याविरोधात उतरली असल्याचे दिसून येत आहे.
पक्षाला फटका बसण्याची चर्चा
प्रचार सुरू होण्याआधीच उमेदवारीवरून पक्षात निर्माण झालेली नाराजी, ठप्प प्रचार यंत्रणा आणि जाहीरनाम्याचा अभाव या तिहेरी अडचणीतून राष्ट्रवादी अजित पवार गट कसा मार्ग काढतो, यावरच या निवडणुकीतील त्यांची कामगिरी अवलंबून राहणार असून, या नारजीवर लवकर पडदा न पडल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सात ते आठ जागांवरच आयात उमेदवार पक्षाकडून मनपा निवडणुकीच्या ७८ जागा लढवल्या जात आहेत. यात ७० जागांवर पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. उर्वरित सात ते आठ जांगावर बाहेरुन आलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी असू शकते.अभिजित देशमुख, शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट