Inquire into the works of the Jal Jeevan Mission
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत, तरी अनेक गावांमध्ये नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे या योजनेतील अपूर्ण कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश सोमवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी नियोजन सभागृहात दिशा समितीची बैठक झाली. यावेळी केंद्र शासनाच्या कार्यालयातील विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस सहअध्यक्ष खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विधान परिषद सदस्य सुहास शिरसाट, आमदार अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, प्रशांत बंब, संजना जाधव, विलास भुमरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीतील निर्णयांच्या अनुपालनाचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा भुमरे यांनी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निकष व भरपाईच्या नियमांमध्ये बदल आवश्यक असल्याचे सांगून याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), बायोमायनिंग, बायोमेडिकल वेस्ट आणि जलजीवन मिशनसह विविध योजनांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळावा, यासाठी भारनियमन टाळावे, असेही भुमरे यांनी निर्देश दिले. उर्वरित विषयांवर शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात येणार आहे-