Inauguration of the University's District Youth Festival
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माणसाला एकदाच आयुष्य मिळत असते. त्यामुळे जगण्याचा पुरेपूर आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आनंद उपभोगताना कसलीही कंजुषी न करता बिनधास्त जगावे, असे प्रतिपादन शुक्रवारी (दि.१९) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देवगिरी महाविद्यालयातील जिल्हा युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जिल्हा युवक महोत्सव १९ व २० सप्टेंबर रोजी देवगिरी महाविद्यालयात होत आहे. महोत्सवात १५१ महाविद्यालयांचे सुमारे ९८५ युवक कलावंत सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले.
कुलगुरु डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, त्रिंबकराव पाथ्रीकर व राजेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी महापौर नंदकुमार घोडले, विवेक जैस्वाल, डॉ भारत खंदारे, डॉ अंकुश कदम यांचीही यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अभय गायकवाड व प्रा. विणा माळी यांनी केले.
मराठवाडयाच्या साहित्य, कला, संस्कृती वृध्दिगत करण्यात युवक महोत्सवाचे योगदान मोठे आहे. जिल्हाभरातून आलेले हजार कलावंत आमच्यासाठी दोन दिवस पाहूणे असून निवास, भोजन व उत्कृष्ट आयोजन या बाबतीत हा महोत्सव संस्मरणीय ठरेल, असा विश्वास प्रा. अशोक तेजनकर यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाने युवक महोत्सव व आविष्कार स्पर्धा या दोन्हींचे विकेंद्रीकरण केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग वाढला. महोत्सवात मुलींचेही प्रमाण वाढल्याने आनंद व्यक्त करत, महोत्सवात विद्यार्थ्यांनी वेळ व शिस्त पाळावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केले.