In the evening, at Goraj Muhurta, Lakshmi Puja and Kuber Puja were celebrated with enthusiasm at every house.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सडा टाकलेल्या अंगणी सुंदर विविध आकर्षक रंगांची रांगोळी, घरावर फुलांच्या तोरणमाळा आणि लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटात, फटाक्यांची तुफान आतषबाजी करत मंगळवारी (दि.२१) मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सायंकाळी गोरज मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मी पूजन व कुबेर पूजन उत्साहात पार पडले. व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये लक्ष्मी पूजनासोबतच चोपडी पूजन केले. यानंतर फटाके फोडण्याचा आनंदही लुटल्याने अवघे आसमंत प्रकाशाने उजळून निघाले.
लक्ष्मी पूजनानिमित्त रोकड धनराशी, दागदागिने, सोन्या-चांदीच्या शिक्क्यांवरील लक्ष्मीच्या छाप्यांची आणि फटाक्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच पूजेत नारळ, लाह्या, बत्तासे, चणे, गूळ, करंजी, लाडूचा प्रसाद आणि केरसुणी यांची देखील मांडणी केली जाते. व्यापारी वर्गात चोपडी पूजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी घरोघरी आणि दुकानांत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन व कुबेर पूजन करण्यात आले. यानिमित्ताने सर्वत्र मोठ्या हर्षोल्हासाचे वातावरण होते. पहाटेपासूनच मांगल्य आणि उत्साहाचा सुगंध दरवळत होता.
घरासमोर शेणाचा सडा टाकत त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. केळीचे खांब, आंब्याच्या पानांची, झेंडूच्या फुलांची तोरणे बांधली. सांयकाळी मिणमिणत्या पणत्या, रांगोळ्या व फुलांच्या सुगंधात शहर आणि परिसरात लक्ष्मी पूजन सोहळा मंगलमय वातावरणात उत्साहात झाला. व्यावसायिक-व्यापाऱ्यांकडून लक्ष्मी पूजनात दुकानांच्या व्यवहारासाठी असलेल्या नव्या हिशेब वही खात्यांचे (चोपड्यांचे) पूजन करण्यात आले. यावेळी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत नागरिकांनी फटाके फोडल्याने सारा आसमंत प्रकाशमय झाला.
लक्ष्मी पूजनासाठी लागणारी झेंडू-शेवंतीची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी मिठाई, लाह्या-बत्तासे, बोळखी, ऊस, पूजेसाठी लागणारे वेगवेगळे खरेदीसाठी दिवाळीच्या दिवशी वाण सकाळपासूनच बाजारात ग्राहकांनी गर्दी केली. कपडे खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड उडाली. मात्र दुपारनंतर काही भागात पावसाने या उत्साहावर वीरजण पडले. अधीच अतिवृष्टीने मराठवाडा संकटात सापडलेला आहे.
अशा परिस्थितीतच छत्रपती संभाजीनगरसह काही भागात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी लक्ष्मी पूजनापर्यंत पाऊस सुरू होता. या पावसाचा बाजारपेठेला चांगलाच फटका बसला. रस्त्यावर पूजेचे साहित्य, पंत्या, फुले घेऊन बसलेल्या छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांचे या पावसामुळे चांगलेच हाल झाले. फटाका विक्रेत्यांनाही त्याचा मोठा फटका बसला. दुपारनंतर पावसामुळे बाजारामध्ये गर्दीच ओसरली. घरासमोर काढलेल्या रांगोळ्यांवरही पावसाचे पाणी फेरल्या गेल्या.
लक्ष्मी पूजनाचा पहिला मुहूर्त मंगळवारी सकाळी ८.१५ ते १०.३०, अभिजीत मुहूर्त ११.५६ ते १२.४२, कुंभ स्थिर मूहूर्त २.२५ ते ४.०० होता. सायंकाळी ७.२२ ते ८.५६ पर्यंत लाभ मुहूर्त आणि शेवटचा मुहूर्त लाभ अमृत १०.३० नंतर मध्यरात्रीपर्यंत होता. यात ५.५१ ते ८.०० पर्यंतच्या प्रदोषकाळ मुहूर्तावर घरोघरी, व्यापारी वर्गाकडून लक्ष्मी पूजन करण्यात आले. तसेच उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीची मनोकामना करत व्यवसायात भरभराटाची प्रार्थना करण्यात आल्याचे पुजारी प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले.