मोबाईल टॉवर Pudhari
छत्रपती संभाजीनगर

मोबाईल टॉवरधारक इमारतींना व्यावसायिक कर लावा

नगरसेवकांची मागणी : ७०० हून अधिक टॉवरपैकी बहुतांश अनधिकृत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोबाईल टॉवर उभारलेल्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर होत असल्याने अशा इमारतींना निवासीऐवजी व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारावा, अशी मागणी सोमवारी (दि.६) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी लावून धरली. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडू शकते, असा दावा सदस्यांनी केला.

महापालिकेच्या प्रशासकीय सभागृहात सोमवारी स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपाच्या उत्पन्नवाढी उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक मजहर पठाण यांनी शहरातील मोबाईल टॉवर आणि त्यावरील कर आकारणीचा मुद्दा उपस्थित केला.

मोबाईल टॉवर असलेल्या मालमत्तांवर नेमक्या कोणत्या प्रकारे कर आकारला जातो, अशी विचारणा त्यांनी केली. यावर सभापती मकरिये यांनी सन २०२२ पासून केंद्र शासनाच्या आदेशानुसार मोबाईल टॉवरवर स्वतंत्र कर आकारणी करता येत नसल्याचे स्पष्ट केले. उपायुक्त विकास नवाळे यांनी निवासी वापराच्या मालमत्तांवर निवासी, तर व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर व्यावसायिक दराने कर आकारला जात असल्याची माहिती दिली.

यावेळी भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी मालमत्ताधारकांना भाडे मिळत असल्याने त्या मालमत्तांचा वापर व्यावसायिक स्वरूपाचा ठरतो. त्यामुळे अशा सर्व मालमत्तांना व्यावसायिक दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

शहरात ६९२ मोबाईल टॉवर अनधिकृत

शहरात ७०० हून अधिक मोबाईल टॉवर असून, त्यापैकी तब्बल ६९२ टॉवर अनधिकृत आहेत. केवळ ५० ते ६० टॉवर अधिकृत आहेत. टॉवर असलेल्या बहुतांश मालमत्तांवर सध्या निवासी दरानेच मालमत्ता कर आकारला जात असल्याची माहिती उपायुक्त विकास नवाळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT