Impact of a dry spell on the district's Kharif crops
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम झाल्याचे २०२६-२७ खरीप हंगामाच्या नजरअंदाज (अंदाजित) पैसेवारीवरून स्पष्ट होत आहे. प्रशासनाने ३० सप्टेंबरला जाहीर केलेल्या पैसेवारीत जिल्ह्यातील १ हजार ३५४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीत एकाही गावाचा समावेश झाल्याचे अढळलेले नाही. यावरूनच खरीप हंगामातील पीक परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले होत आहे.
एलनिनोच्या प्रभावाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. येथील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. कमी पर्जन्यमानामुळे व त्यात सर्वाधिक पावसाचा खंड राहिल्याने त्याचा परिणाम छत्रपती पिकांच्या वाढीवर झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांत सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या खरीप पिकांची स्थिती प्रतिकूल झाली आहे. काही ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत जाहीर झालेल्या पैसेवारीकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागले होते.
जिल्ह्यात प्रशासनाकडून झालेल्या पैसेवारीत १० तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या १३५४ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात ७ लाख ९१ हजार ५०४.३२ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी ७ लाख ५४ हजार ९७२.१८ हेक्टरमध्ये खरिपाची प्रत्यक्ष पेरणी झाली. यात ५३ हजार २२४.५ हेक्टर पडीक क्षेत्र आहे. या एकूणच क्षेत्रातील खरीप पिकांची स्थिती प्रतिकूल असल्याचे चित्र समोर आले आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १ हजार ३५४ असून, ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेले एकही गाव अढळलेले नाही.
शेतकऱ्यांचे लक्ष आढाव्याकडे
खरीप पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि आगामी रब्बी हंगामास उपलब्ध होणारे पाणी, या पार्श्वभूमीवर पैसेवारीची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने पीक परिस्थितीच्या पुढील आढाव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पैसेवारीतून २७ गावे वगळली
पैसेवारी निश्चित करताना काही गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट आहे. त्यामुळे ही गावे पैसेवारीतून वगळली. तसेच पैठणच्या १९३ गावांपैकी चार गावे मनपा हद्दीत असल्याने तेही वगळले. तर गंगापूरच्या २२६ महसुली गावांपैकी चार गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित असल्याने तीही वगळली. अशा २७ गावांचे पैसेवारी झालेली नाही.
मराठवाड्यात ८४९६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांत १ ऑक्टोबर रोजी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात पावसाच्या खंडामुळे विभागात तब्बल ८ हजार ४९६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे अढळून आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १३५४ गावांचा समावेश आहे. तर बीड १ हजार ३९७, परभणी ८३२, नांदेड १५६२, जालना ९७१, लातूर ९५२ तर हिंगोलीच्या ७०७ गावांचा समावेश आहे.