आंदोलनामुळे शहरातील अनेक रुग्णालयांनी असे ओपीडी बंदचे फलक लावले होते. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar doctors strike : ८० टक्के खासगी डॉक्टरांच्या 'बंद'मुळे ओपीडी सेवा ठप्प

आयएमएचे आंदोलन, नियोजित अडीचशे शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने रुग्णांची हेळसांड

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बीएसएमएस-सीसीएमपी डॉक्टरांना एमएनसीमध्ये नोंदणी देण्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) मंगळवारी (दि.४) सकाळी ६ वाजेपासून पुकारलेल्या २४ तासांच्या वैद्यकीय सेवा 'बंद' आंदोलनात शहरातील ८० टक्के खासगी डॉक्टरांनी सहभागी होत ओपीडी सेवा बंद ठेवली.

दिवसभरात २५० हून अधिक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. आपत्कालीन आणि आयपीडी सेवा सुरू होती, मात्र ओपीडी बंद असल्याने तपासणीसाठी आलेल्या अनेक रुग्णांची हेळसांड झाल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये सीसीएमपी डॉक्टरांना नोंदणी देण्यावरून हॉमिओपॅथी आणि अलोपॅथी डॉक्टर आमनेसामने आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण तापले आहे. एकीकडे बीएसएमएस सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी म्हणून तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ही नोंदणी करू नये, अशी मागणी सुरू आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मंगळवारी सकाळपासून २४ तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलन पुकारण्यात आले.

शहरातील तीन हजार खासगी डॉक्टरांपैकी ८० टक्के डॉक्टरांनी संपात सहभाग नोंदवला. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील खासगी डॉक्टरांचे दवाखाने आणि ओपीडी तपासणी बंद होती. काही भागांत हॉस्पिटल, क्लिनिकबाहेर ओपीडी बंदचे फलक लावण्यात आले होते. अत्यावश्यक ऑपरेशन झाले. मात्र नियोजित दोनशेहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे अनेक रुग्ण, नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सरकारी रुग्णालयांमध्ये गर्दी

खासगी दवाखाने बंद असल्यामुळे शहरातील घाटी, मिनी घाटी रुग्णालय तसेच मनपा आरोग्य केंद्रात तपासणीसाठी रुग्णांची मोठी गर्दी झाली. वाढत्या गर्दीमुळे रुग्णांना उपचारासाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागली.

राज्यात बेमुदत संप- शहरातील ८० टक्के खासगी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या रुग्णालयातील सकाळी ६ वाजेपासून दिवसभर ओपीडी सेवा बंद होती. एकूण नियोजित २५० ऑपरेशन पुढे ढकलण्यात आले. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरु राहिल.
डॉ. प्रशांत दरक, सचिव, आयएमए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT