ऐन पावसाळ्यात घरांवर बुलडोजर चालवून नागरिकांना अशा प्रकारे रस्त्यावर आणण्यात येत आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Monsoon crisis : ऐन पावसाळ्यात शेकडो कुटुंब बेघर

मनपाच्या तोडफोडीचा परिणाम, इंदिरा आवासची घरेही पाडली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सर्व्हिस रोडच्या नावाखाली मालकी हक्कात असलेल्या गरिबांच्या घरांसह दुकानांवर बुलडोजर चालवण्याचा सपाटा लावला आहे. या कारवाईमध्ये कोणतीही नोंद ठेवली जात नसल्याचा प्रकार सोमवारी पुन्हा पैठण रोडवर आढळला.

यात कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी या गावठाणमध्ये ग्रामपंचायतीने बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून दिलेल्या घरांवरदेखील प्रशासनाने बुलडोजर चालविला. यात नोटीसच काय तर साधे पंचनामे देखील केलेले नाही. महापालिकेने जालना रोडनंतर सोमवारी (दि. 30) पैठण रोडवर महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी यादरम्यान असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

मनपाच्या कारवाईमुळे अगोदरच सामान्य नागरिक धास्तावले आहेत. महापालिकेत शहरालगतच्या काही गावठाणांचा समावेश झाला आहे. त्यात कांचनवाडी आणि नक्षत्रवाडीचा देखील समावेश आहे. मात्र, असे असतानाही या भागात ग्रामपंचायतींमार्फत गोरगरीब आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना इंदिरा आवास योजनेतून लाभ देत घरे बांधून देण्यात आली होती. महापालिकेने गावठाणाच्या जागेत पाडापाडी करताना नियमानुसार कागदपत्रांची तपासणी करून पंचनामे करणे आवश्यक होते.

एवढेच काय तर न्यायालयाने अ ॉगस्टपर्यंत घरांना धक्का लावू नये, असे आदेश दिले असतानाही महापालिकेने कारवाई करीत घरे पाडली. पावसाळ्यात घरांवर कारवाई करता येत नाही, हे नियमही महापालिकेचे अधिकारी विसरले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चिकलठाणा, कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील शेकडो कुटुंब बेघर झाले आहेत.

बांधकामाचा खर्च कोण देणार?

महापालिकेने खासगी मालमत्ताधारकांच्या मालकी हक्काची बांधकामांची अनधिकृतच्या नावाखाली नियमबाह्यरीत्या पाडली. जर शासनाच्या आवास योजनेतून घरे बांधली होती. तर योजनेचा लाभ अनधिकृतरीत्या दिला होता का, असा देखील सवाल कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT