ठळक मुद्दे
जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक
हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही मुदतवाढ दिली आहे
नंबर प्लेट लावली नसल्यास आरटीओच्या कारवाईला सामोरे जावे लागणार
छत्रपती संभाजीनगर : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. याची मुदत ३० नोंव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या हाती केवळ २२ दिवस उरले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ६१ हजार वाहनधारकांनी या नंबर प्लेटसाठी नोंदणीही केलेली नाही. दरम्यान, यात मुदतवाढ मिळेल की नाही हे सांगता येत नाही, परंतु मुदत संपताच वायुवेग पथक कारवाई करणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी) बसवून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. आजपर्यंत सुमारे ३ लाख ३९ हजार वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ८० हजार वाहनांना या नंबर प्लेट बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ७ लाख वाहने आहेत. आजही सुमारे ३ लाख ६१ हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही. उरलेल्या २३ दिवसांत या सर्व वाहनधारकांना नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा आरटीओच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
चौथ्यांदा मुदतवाढ
नंबर प्लेटसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे जिल्ह्यात सुमारे ५० पेक्षाही जास्त ठिकाणांहून नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. तरीही वाहनांची संख्या जास्त असल्याने ही मुतदवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ त्यानंतर ३० जून २०२५ तसेच १५ ऑगस्ट २०२५, तर त्यानंतर ३० नोव्हेंबर अशी चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीबाबत अद्यापतरी निर्णय आला नसल्याची माहिती आरटीओच्या वतीने देण्यात आली.
मुदतीनंतर होणार कारवाई
हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी ३० नोव्हेंबर ही मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ चौथी आहे. त्यानंतर मात्र आरटीओच्या वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरटीओच्या वतीने देण्यात आला.