छत्रपती संभाजीनगर : जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरणानंतर इयत्ता बारावीच्या परीक्षेत बुधवारी पुन्हा तीन कॉपी केसेसची नोंद झाली. यात वैजापूर तालुक्यातील लाखखंडाळा येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आले. त्यांना रस्टिकेट करण्यात आले. तर फुलंब्री येथील संत सावता येथील केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला.
राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात यंदा १६० केंद्रांवरून तब्बल ६५ हजार विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देत आहेत. शिक्षण विभागाकडून यंदाही कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे. कॉपी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १० फेब्रुवारी रोजी कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याचे दस्तरखुद्द शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत उघडकीस आले होते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली येथे सामूहिक कॉपी झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत या केंद्राचे संचालक, परीक्षा केंद्रावर तैनात सर्व १८ शिक्षकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. या पेपरलाही जिल्ह्यात तीन ठिकाणी कॉपी केसेसची नोंद झाली.
वैजापूर तालुक्यातील लाखखंडाळा केंद्रावर भरारी पथकाला दोन विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आले. तर बोर्डाच्या पथकाने फुलंब्री येथील संत सावता विद्यालयाच्या केंद्रावर एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.