छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी नव्याने जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र या ३९ किलोमीटर अंतरात टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम अजूनही पाणीपुरवठा करण्यायोग्य पूर्ण झाले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याची घाई आताच करू नका, असे आदेश शुक्रवारी (दि.२०) उच्च न्यायालयाने योजनेच्या अर्धवट कामांसंदर्भातील छायाचित्रेही पाहिल्यानंतर दिले.
या सुनावणीवेळी महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांतही ऑनलाईन हजर झाले. त्यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली असून, त्याची माहिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला ठेवून आयुक्त श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले.
संबंधित पाणीपुरवठा योजना ही २०५० मधील लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आलेली असून, घाईत काम उरकून चालणार नाही, असेही न्यायालयात सांगण्यात आले. उच्च न्यायालयात १८ फेब्रुव-ारीला सुनावणी झाली त्यात १९ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने पाणीपुरवठा योजन-`ची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांनी दिले होते.
यात उद्भव विहिरीची स्वच्छता झालेली नाही. २५०० एमएमची मोठी जलवाहिनी असून, त्यातील पॅकिंगचे ८७ठिकाणे असून, त्यापैकी अनेक खराब झालेली आहेत. स्वच्छता झालेली नाही, असे सांगत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्यांच्या मनपा स्तरावर स्वच्छता व इतर कामासाठी शंभर ते दीडशे कर्मचारी देऊ शकतो, असे सांगितले. तसेच अग्निशमन दलाच्या यंत्रणेमार्फत स्वच्छता मोहीम राबवू शकतो, असे सांगत त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामही १२-१५ कर्मचाऱ्यांना पाठवून करून घेतल्याचे उच्च न्यायालयात सांगितले.
कंत्राटदाराच्या वतीने सांगण्यात आले की, ८० टक्के स्वच्छतेचे काम झाले आहे. केवळ २० टक्केच बाकी आहे. यावेळी वीज जोडणीचाही मुद्दा मांडण्यात आला. यावेळी कंत्राटदार कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एम. धोर्डे, मजीप्राच्या वतीने अॅड. राजेंद्र देशमुख, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, अॅड. विनोद पाटील, मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टोपे, मूळ याचिकाकर्ते अमित मुखेडकर आदी सुनावणीवेळी हजर होते.
वीज बिलापोटी महिन्याला चार कोटींचा भुर्दंड
उच्च न्यायालयाने वीज जोडणीशी संबंधित करार किती दिवसांत करता येईल, अशी विचारणा केली. त्यावर आयुक्त जी. श्रीकांत यांनी वीज जोडणीचा करार आताच केला तर महिन्याला ४ कोटी रुपयांचा भरणा करावा लागेल, कारण खर्च तातडीने सुरू होईल.
..तर नुकसानीची यादी करा
एक जलपंप सात कोटींचा असून, असे दहा पंप आहे. त्यावर न्यायालयाने जी कामे अर्धवट आहेत, ज्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे, आत्ताच पाणीपुरवठा सुरू केला तर काय नुकसान होऊ शकते, अशी एक यादी तयार करून ती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले. जुने २६ जलकुंभ व नवीन जलकुंभांमधून शहराच्या २ तृतीयांश भागात पाणीप-रवठा करता येऊ शकतो. त्यामुळे एक दिवसांआड पाणी येऊ शकेल, असेही एक निवेदन करण्यात आले.