कन्नड : तालुक्यात रविवारी (दि.1) रात्री पासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. यावेळी तालुक्यातील शिवना, गांधारी, पूर्णा, अंजना, या प्रमुख नद्यांसह इतर नदी नाल्याला दुसऱ्या दिवशी दुथडी भरून महापूर आल्याने तालुक्यातील प्रमुख मध्यम तसेच लघु प्रकल्पात पाणीसाठा सातत्याने वाढत आहे.
कन्नड तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 672.50 मिमी इतकी असून रविवारी (दि.1) एका दिवसामध्ये ४२.७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच सोमवारी (दि.2) सप्टेंबरपर्यंत 601 मिमी इतक्या सरासरी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. जर जिल्ह्यामध्ये असच पाऊस सुरु राहिला तर पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. असे हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील कन्नड आणि चिखलठाण महसूल मंडळात पाऊस होऊन शिवना व गांधारी नदीला मोठा पूर आला आहे. या दोन्ही नद्या दुधडी भरून वाहिल्याने बंधारे पूर्ण क्षमते भरले आहेत. यामुळे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात संध्याकाळपर्यंत 40 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्याचप्रमाणे पिशोर, करंजखेडा, नाचनवेल, चिंचोली मंडळात सुद्धा पाऊस जोरदार बरसल्याने जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या पूर्णा नदीला महापूर आल्याने पूर्णा नेवपूर प्रकल्प १०० टक्के भरला असून पिशोरच्या अंजना पळशी प्रकल्पात ८०% पाणीसाठा झाला येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आसल्याने कोणत्याही क्षणी प्रकल्प ओव्हरप्लो होवू शकतो. यामुळे अंजना नदीच्या काठी आसलेल्या नागरीकांनी सतर्क राहून आपली व आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आहवान जलसंपदा पाट बंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
शिवना-टाकळी - ४० टक्के, अंजना-पळशी - ८०, टक्के, गंधेश्वर १०० टक्के, गौताळा - १०० टक्के, निंभोरा (तपोवन) १०० टक्के, कुंजखेडा १०० टक्के, सातकुंड- ९४ टक्के, गडदगड -- १०० टक्के, वाघदरा - ३८.६८ टक्के, अंबा - ५६.३८ टक्के, सिरसगाव - १०.५७ टक्के, रिठ्ठी मोहर्डा - ३५.३१ टक्के, माटेगाव - २९.९६ टक्के, तर अंबाडी प्रकल्प, गणेशपुर, वडोद, मुंगसापूर, वडनेर, चापानेर, औराळा ही प्रकल्प जोत्याखाली आहे.