Heatwave Warning Issued for the District and Marathwada Region
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यासह मराठवाड्यातील कमाल तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधसाठा आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सूर्य देवता कोपल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यात कमाल तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आहे. सरासरी तापमानापेक्षा हे प्रमाण तब्बल ५.१ अंश सेल्सिअसने जास्त आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मराठवाडा विभागासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने घाटी, मिनी घाटीसह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधसाठा आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
१५ मे पर्यंत पारा वाढणार
मराठवाडा विभागात १२ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. १५ मेपर्यंत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तापमानही सरासरीपेक्षा ३.१ ते ५.० अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता असल्याने रात्रीचा उकाडाही वाढणार आहे.
काय काळजी घ्यावी?
पुरेसे पाणी प्या : तहान लागलेली नसली तरी दिवसातून वारंवार पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिबूपाणी, ताक किंवा तांदळाची पेज (तोराणी) यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.
बाहेर जाणे टाळा : दुपारी १२ ते ३ या वेळेत कडक उन्हात 2 बाहेर जाणे टाळावे. अत्यंत आवश्यक असल्यास डोके झाकून किंवा छत्रीचा वापर करूनच बाहेर पडावे.
3 योग्य पेहराव करा : हलक्या रंगाचे, सैल व सूती कपडे वापरावेत.
शेतीसाठी सल्ला : शेतकऱ्यांनी पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. भाजीपाला पिकांसाठी आच्छादन तंत्राचा वापर करावा.