छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात महिनाभरापासून उष्णतेची लाट जाणवत आहे. या उष्णतेसोबतच विभागातील पाणीटंचाईची तीव्रतादेखील सातत्याने वाढते आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यातील शेकडो गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून यातील 142 गावे आणि 78 वाड्यांना 257 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय 536 गावांमध्ये 647 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यंदा मराठवाड्यात नेहमीपेक्षा किंचित उशिराने, म्हणजे मार्चअखेरीसपासून पाणीटंचाईने डोके वर काढले. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात केली. तरीदेखील एप्रिल महिन्यात टँकरची संख्या शंभराच्या आत होती. परंतु मे महिन्यात मात्र शेकडो गावांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
परिणामी, सध्या मराठवाड्यात 142 गावे आणि 78 वाड्यांना 257 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय 647 विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यातील 127 विहिरी या टँकर भरण्यासाठी तर उर्वरित विहिरी या स्थानिक लोकांना थेट पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
संभाजीनगरात सर्वाधिक टँकर
मराठवाड्यात सध्या सर्वाधिक 175 टँकर छत्रपती संभाजीनगरात सुरू आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 57, नांदेड जिल्ह्यात 11, परभणी जिल्ह्यात 7, धाराशिव जिल्ह्यात 3 आणि हिंगोली व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 2 टँकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यात मात्र यंदा अद्याप एकही टँकर सुरू नाही.