छत्रपती संभाजीनगर : ७९ वर्षीय वृद्ध महिला, त्यात हृदयविकाराच्या झटका आल्याने अतिगंभीर स्थितीत घाटीत दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयाची एक रक्तवाहिनी बंद असल्याने त्यांच्यावर ओसीटी (ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी) या अत्याधुनिक पद्धतीने शुक्रवारी (दि.७) उपचार करण्यात आले. सध्या या वृद्ध महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. गणेश सपकाळ यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मराठवाड्यात प्रथम घाटीतील सुपरस्पेशालिटीमध्ये ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी ३ नोव्हेंबर रोजी या वृद्ध महिलेस घाटीतील अतिविशेषोपचार रुग्णालय (एसएसबी) येथे दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटका आल्याने महिलेची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने औषधोपचार सुरु केले. दुसऱ्या दिवशी ॲंजोग्राफी करण्यात आली. यात हदयाच्या दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आणि एक रक्तवाहिनी बंद असल्याने आढळून आले. त्यामुळे अँजिओप्लास्टीचा निर्णय घेण्यात आले. वयोमानानूसार हायरिस्क असताना तज्ज्ञ डॉक्टरांनी अनुभवाच्या जोरावर ओसीटी अत्याधुनिक पद्धतीव्दारे अचूक उपचार केले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, ओ. एसडी डॉ. सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅथलॅब मधील हृदयरोग विभागप्रमुख डॉ. गणेश सपकाळ व त्यांच्या टिमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यासाठी विद्युत वैद्यकीय तंत्रज्ञ पूजा जगताप, प्रशासकीय अधिकारी महेश गावंडे, भूलतज्ञ डॉ. अमेर, डॉ. रोहन गावंडे, सिस्टर छाया कपलेश्वरी, प्रतिभा अंधारे, दिरा किलबिले, बीजी नायर, माधुरी मकासारे, महेश लावरे, निवृत्ती घोगरे, पराग जोशी यांच्यासह अनेकांनी सहाय्य केले.
अतिविशेषोपचार रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना लाभ होत आहे. अतिविशेषोपचार रुग्णालयात शंभर अँजिअ-ोप्लास्टी यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी.
काय आहे ओसीटी अत्याधुनिक उपचार पद्धत ? ओसीटी हे अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आहे. जे प्रकाशाच्या सूक्ष्म तरंगांचा वापर करून हृदयातील रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचे अतिशय तपशीलवार चित्र दाखविते. पारंपरिक अंजिओग्राफीत केवळ रक्तवाहिन्यांचा आकार आणि प्रवाह दिसतो; परंतु ओसीटीमुळे त्या रक्तवाहिन्यांमधील चरबी, तुटलेले भाग, तसेच स्टेंट किती चांगला बसला आहे. याचे नेमके मूल्यांकन करता येते.