Hasul to Nakshatrawadi ward formation begins
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेच्या प्रभाग रचना तयार करण्यासाठी प्रशासनाने समिती गठित करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. उत्तर ते दक्षिण या प्रमाणे हसूल ते नक्षत्रवाडी असे झिकॉक पद्धतीने प्रभाग तयार केले जाणार आहे. यासाठी आजपासून (दि. १९) स्थळपाहणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, २०११ सालची जनगणना गृहीत धरली जाणार असल्याने २९ प्रभाग होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची निवडणूक आतापर्यंत वॉर्डनिहाय घेण्यात येत होती. मात्र यंदा प्रथमच ही निवडणूक प्रभागनिहाय होणार आहे. यापूर्वीची महापालिका निवडणुकीतील ११५ वॉर्ड होते. त्यासाठी २०११ सालचीच लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. आता ४ वॉर्डाचा एक प्रभाग यानुसार प्रभाग रचना तयार करतानाही याच लोकसंख्येचा आधार घ्यावा लागणार असल्याने किमान २९ प्रभाग होण्याची शक्यता आहे. महापालिकेने प्रभागरचना करण्यासाठी समिती गठित केली असून, ही समिती प्रभाग रचनेच्या कामावर लक्ष ठेवणार आहे.
दरम्यान, प्रभाग रचनेसाठी आजपासून (दि.१९) स्थळपाहणी केली जाणार आहे. या पाहणीमध्ये प्रभागांची नैसर्गिक हद्द, त्यातील रस्ते यासर्वांचा विचार करून उत्तर ते दक्षिण या पद्धतीने प्रभाग रचनेला सुरुवात केली जाणार आहे.
यात उत्तर दिशेने सुरुवात करून झिकझंक पद्धतीने दक्षिण दिशेला प्रभाग संपविण्यात येणार आहे. त्यानसार हर्सल ते नक्षत्रवाडी, अशी प्रगणक गटाची रचना केली जाणार असून, एका प्रगणक गटामध्ये किती लोकसंख्येचा असेल ही माहिती प्रभाग रचना तयार करतानाच पुढे येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
महापालिका आजपासून प्रभाग रचना तयार करण्यासाठी स्थळपाहणी सुरू होणार आहे. यंदा प्रभाग पद्धत असली तरी नगरसेवकांची संख्या तेवढीच म्हणजे ११५ ते १६ राहणार असल्याने साधारणपणे एक प्रभाग ३६ हजार ते ४२ हजार लोकसंख्येचा असेल, अशी शक्यता आहे.
मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करताना अत्यंत गोपनीयता पाळली जाणार आहे. यातील माहिती बाहेर येता कामा नये, अशा सूचना समितीच्या अधिकार्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना सादर करेल. त्यानंतर निवडणूक आयोग प्रभागाचे आरक्षण जाहीर करणार आहे. एका प्रभागामध्ये अ, ब, क, ड प्रमाणे चार सदस्य असले तरी आरक्षण ठरवूनच हे प्रभाग निश्चित होणार आहे. या प्रत्येक प्रभागामध्ये आरक्षणाचा किमान एक सदस्य राहणार आहे.