छत्रपती संभाजीनगर : बहिणीसाठी आणलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या भावाची भरदिवसा मेडिकलमध्ये घुसून चाकू भोसकून निघृण हत्या करण्यात आली. हा थरार शुक्रवारी (दि. ११) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हर्मूल परिसरातील करीमनगर येथे घडला. शेख मोहम्मद फैसल अब्दुल कादर (२२, रा. उमर कॉलनी, हसूल) असे मृताचे नाव असून तो मेडिकल चालक होता.
दरम्यान, मुख्य आरोपी रेहान अमीन पटेल (२५, रा. करीमनगर, हसूल) आणि त्याचा साथीदार समीर रईस शेख या दोघांना हसूल पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख फैसल हा करीमनगर येथील कोलठाणवाडी रोडवरील आयशा मंजिल येथे लाइफ लाइन मेडिकल चालवत होता.
शुक्रवारी (दि. ११) दुपारी १२.३० ते १२.५७ वाजेच्या सुमारास फैसल हा त्याच्या दुकानावर असताना आरोपी रेहान पटेल आणि त्याचे काही साथीदार तिथे आले. त्यांनी फैसलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपी रेहान याने चाकू काढून थेट फैसलच्या पोटात भोसकला आणि साथीदारांसह तेथून पळ काढला. या जीवघेण्या हल्ल्यात फैसल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
शेजारील दुकानातील दोघांनी तातडीने रक्ताभंबाळ अवस्थेतील फैसलला एका रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दुपारी १.२५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी फैसलला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उपयुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी मयत फैसलचा भाऊ शेख मुस्ताकीम (२४) यांच्या तक्रारीवरून हर्मूल पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन सदाफुले करत आहेत.
लग्नाला नकार दिल्याने ठेवली खुन्नस
पाच ते सहा महिन्यांपूर्वी आरोपी रेहान पटेल याने फैसलच्या १९ वर्षीय बहिणीसाठी लसाचा प्रस्ताव आणला होता. मात्र, तिचे लग्न दुसरीकडे ठरले असल्याने फैसलच्या कुटुंबाने रेहानचा प्रस्ताव नाकारला होता. याच कारणावरून रेहानने त्यांच्यावर खुन्नस ठेवली होती. तो नेहमी त्यांच्या घराजवळून आणि दुकानासमोरून जाताना बुलेट गाडीचा मोठा आवाज करून त्यांना त्रास देत असे, अशी माहिती समोर आली आहे.
घाटीमध्ये नातेवाईकांची गर्दी
रोज आपल्या कामाशी काम ठेवत घरातील जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या फैजलचा खून झाल्याची माहिती ऐकून मित्र व नातेवाईकांनी घाटी परिसरात मोठी गर्दी केली होती. फैजलच्या कुटुंबात आई, वडील, दोन बहीण व भाऊ असा परिवार आहे.
चाकू अडकला पोटातच
दोन दिवसांपूर्वी फैसलच्या मेडिकलला आग लागली होती. त्यामुळे परिसरात रेहान व साथीदारांनीच आग लावल्याचे पसरले होते. त्यानंतर आरोपीनी थेट त्यांच्या मेडिकलमध्ये घुसून वाद घालत थेट त्यांच्या पोटात खुपसला. चाकू फैसलच्या पोटात अडकला तर त्याची मूठ घटनास्थळी पडलेली होती. आरोपी रेहान हा एका केबल चालकाकडे कामाला आहे तर समीर मजुरी करतो.