Crime News Pudhari
छत्रपती संभाजीनगर

आधी खुन्नसवरून वाद, मग थेट अंगावर घातली कार

या रेट्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवले, त्यानंतर जमाव शांत झाला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आज तुला खतमच करतो अशी उघड धमकी देत एका सराईत गुंडाने दुचाकीस्वार तरुणाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. एवढेच नव्हे, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या अंगावरून कार रिव्हर्स घेत त्याला चिरडण्याचा भयंकर प्रकार पैठण रोडवरील संताजी पोलिस चौकीसमोर उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री ९.३० वाजता घडली.

सूरज रमेश देवकाते (३५, रा. कांचनवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि मुख्य आरोपी नवनाथ ऊर्फ वावट्या भाई गोपीचंद मोते यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि खुन्नस देण्यावरून एका बिअर बारसमोर वाद झाला होता. याच रागातून वावट्या भाईने सूरजच्या दुचाकीला आपल्या कारने धडक दिली.

सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याचा भाऊ चरण खटके आणि मित्र रविकांत धनेधर, अवचित थाले, दीपक कारके मदतीला धावले. मात्र, मद्यधुंद असलेल्या वावट्या भाई आणि त्याचे साथीदार भागवत मोते, आकाश वाघमोडे, अभिषेक दहिवळ आणि गोरख शिंदे (सर्व रा. कांचनवाडी) यांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. आरोपींनी अवचितच्या डोक्यात मोठा दगड घातला. सुमारे २० मिनिटे या गुंडांनी रस्त्यावर दहशत माजवत सूरजला वेळेवर उपचार मिळण्यापासून रोखले.

आंदोलनानंतर पोलिसांना जाग

सुरुवातीला सातारा पोलिस ठाण्यात या प्रकरणी केवळ अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी (दि. २३) जखमी सूरजच्या संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यावर धडक देत तीव्र आंदोलन केले. या रेट्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवले, त्यानंतर जमाव शांत झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT