Grant an Additional Increment to District Award-Winning Teacher Shinde!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षक दिवाणराव पंडिराव शिंदे यांना १२ आठवड्यांत अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा आदेश नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. वैशाली पाटील जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला दिला.
याचिकाकर्ते दिवाणराव शिंदे सिल्लोड तालुक्यातील पालोद विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून ३१ डिसेंबर २००७ ला निवृत्त झाले होते. त्यांना जिल्हा परिषदेने ५ सप्टेंबर १९९८ ला जिल्हा शिक्षक पुरस्कार दिला होता. त्यानंतर शासनाने १२ डिसेंबर २००० ला जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे शासन निर्णयाद्वारे आयोगानुसार आगाऊ अथवा अतिरिक्त वेतनवाढीची तरतूद नव्हती.
शासनाने ४ सप्टेंबर २०१८ ला जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढ देणे बंद केले. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता ज्या शिक्षकांना ४ सप्टेंबर २०१८ पूर्वी जिल्हा पुरस्कार प्रमाणपत्रे दिली आहेत, त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ नाकारता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.
याचिकाकर्त्यास २००० च्या शासन निर्णयानुसार, ते एक अतिरिक्त वेतनवाढ मिळण्यास पात्र असल्याचे अॅड. विठ्ठलराव सलगरे यांनी निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने यापूर्वी ५ मार्च २०२० रोजी दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेत प्रस्तुत प्रकरण निकाली काढले.