Gokul Chairman Election Pudhari news
छत्रपती संभाजीनगर

Gokul Chairman Election | गोकुळ अध्यक्ष निवडीत ट्विस्ट; शासन नियुक्त चारही संचालकांना मतदानाचा अधिकार

चार मतपत्रिका स्वतंत्र पेटीत ठेवण्याचे औरंगाबाद हायकोर्टाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी अनपेक्षित ट्विस्ट निर्माण झाला. शासन नियुक्त चारही संचालकांना मतदानाचा अधिकार नाकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे मंगळवारी (दि. १०) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या २५ संचालकांसह शासन नियुक्त चार सदस्यांनाही मतदान करता येणार आहे. मात्र, या चार सदस्यांनी केलेले मतदान स्वतंत्र मतपेटीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे.

समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांनी शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश रद्द करण्यासाठी दाखल केलेल्‍या याचिकेवर सोमवारी औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. ते म्‍हणाले, शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. पराभवाचे विजयात रूपांतर करण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे. अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी स्थगित होणे ही अध्यादेश काढण्यासाठी केलेली राजकीय खेळी असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एखाद्या संस्थेसाठी अशा प्रकारे कायदा करणे घटनाबाह्य असून हा अधिकाराचा दुरुपयोग आहे.

राज्य शासनाची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी म्हणाले, अध्यादेश हा कायद्याच्या स्वरूपात असून पहिल्याच सुनावणीत त्याला स्थगिती देता येणार नाही. शासनाला अशा सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. एखाद्या संस्थेसाठीच हा कायदा करण्यात आल्याचा आरोप चुकीचा आहे. न्यायालयाचा यापूर्वीचा आदेश केवळ निवडणूक घेण्यासंदर्भात आहे. शासन नियुक्त सदस्य कोणाला मतदान करणार, हे गुप्त मतदानामुळे आधीच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नियुक्त संचालकांसाठी स्वतंत्र मतपेटी

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कायद्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले. तसेच शासन नियुक्त चार सदस्यांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या मतपत्रिका स्वतंत्र मतपेटीत ठेवण्याची सूचना केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. श्रीकृष्ण गणबावले, ॲड. उमेश बोडखे-पाटील, ॲड. आनंद लांडगे आणि ॲड. सार्थक दिवाण यांनी काम पाहिले.

शिवाजी आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील ‘गोकुळ’वर शासन नियुक्त सदस्‍य

मुंबई : राज्य सरकारने ‘गोकुळ’वर शासन नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवाजी दिनकर आडनाईक (यवलूज, ता. पन्हाळा), डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे (पेठवडगाव, ता. हातकणंगले), प्रशांत भगवान पाटोळे (विश्रामबाग, जि. सांगली) आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील, (केनवडे, ता. कागल) यांची नियुक्ती केली आहे. या चार सदस्यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार दिला आहे. याबरोबर सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णात ठाकरे यांची शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT