Auric Industrial City : बिडकीन ऑरिकमध्ये गोडावरी एनर्जीकडून ४४०० कोटीची गुंतवणूक file photo
छत्रपती संभाजीनगर

Auric Industrial City : बिडकीन ऑरिकमध्ये गोडावरी एनर्जीकडून ४४०० कोटीची गुंतवणूक

ऊर्जा व बॅटरी साठवणूक प्रकल्प, तब्बल २१०० रोजगार निर्मिती होणार

पुढारी वृत्तसेवा

Godavari Energy to invest ₹4,400 crore in Bidkin AURIC

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बिडकीन येथील ऑरिक इंडस्ट्रियल सिटी आता केवळ वाहन उद्योगापुरती मर्यादित न राहता 'ग्रीन एनर्जी' आणि बॅटरी साठवणूक क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. या औद्योगिक पट्टयात ऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज क्षेत्रातील प्रकल्पासाठी कंपनी ४,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून २,१०० रोजगार निर्माण होऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील उद्योगांसाठी नुकतेच करण्यात आलेल्या एमओयूंच्या यादीमध्ये गोडावरी न्यू एनर्जीचा प्रस्ताव क्रमांक २३२ वर आहे. या कंपनीने बिडकीन येथील औद्योगिक क्षेत्रात सेक्टर ४ मधील प्लॉट क्र. १७७-ए ची निवड केली असून, ऑरिक प्रशासनासोबत आवश्यक कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंपनीच्या प्रकल्पाचे क्षेत्र ऊर्जा व बॅटरी साठवणूक असे स्पष्ट केले.

प्रस्तावित गुंतवणुकीच्या दृष्टीने हा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ऑरिक सोबत करार करण्यात आला आहे. ऑरिक- बिडकीन परिसरात यापूर्वीपासून वाहन उद्योगाशी संबंधित प्रकल्पांचे प्रस्ताव आहेत. एमओयूच्या यादीत मेटलमॅन ऑटोने २०२ कोटी रुपये गुंतवणूक व ५०१ रोजगार, तर फ्रॉम पॅकेजिंग सिस्टिम्सने १५० कोटी रुपये गुंतवणूक व १०० रोजगार प्रस्तावित केले आहेत. याच परिसरात अक्षय ऊर्जा क्षेत्रातील जुन्ना सोलर सिस्टिम्स लिमिटेड नेही सेक्टर ४ मधील प्लॉट क्रमांक ५० येथे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १,०५० रोजगार प्रस्तावित केले आहेत.

प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्याकडे लक्ष

कंपनीच्या ४,४०० कोटींच्या या प्रस्तावामुळे बिडकीनच्या औद्योगिक क्षेत्राच्या क्षमतेकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. आता कंपनीकडून प्रकल्पासाठी पुढील प्रक्रिया, भूखंडाचा विकास आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. एमओयूच्या यादीत दिलेले आकडे प्रस्तावित असल्याने त्यांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT