Ghrishneshwar Temple File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ghrishneshwar Temple: घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात अभिषेक बंद; देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Ghrishneshwar temple Shravan darshan rules

छत्रपती संभाजीनगर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. श्रावणात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, दर्शनाच्या रांगा कमी करण्यासाठी आणि शिवभक्तांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी संपूर्ण महिनाभर घृष्णेश्वराचा अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. या निर्णयानुसार, शुक्रवारपासून (दि.२५) सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले राहणार आहे.

गर्दीचे नियोजन आणि भाविकांची सोय

श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या काळात घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशभरातून भाविकांचा महासागर लोटतो. सामान्य दिवसांमध्ये दररोज जवळपास एक लाख भाविक दर्शनासाठी येतात, तर श्रावणी सोमवारी हा आकडा दोन लाखांच्या घरात पोहोचतो. अनेक भाविक अभिषेकाचा संकल्प करतात. मात्र, अभिषेकाला लागणाऱ्या वेळेमुळे दर्शनाच्या रांगांची गती मंदावते आणि तासनतास प्रतीक्षा करणाऱ्या इतर भाविकांची मोठी गैरसोय होते. हीच अडचण लक्षात घेऊन, अधिकाधिक भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, या उद्देशाने देवस्थान ट्रस्टने श्रावण महिन्यापुरता अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिषेकाऐवजी आता केवळ फुले वाहता येणार

अभिषेक बंद असला तरी, भाविकांना आपली श्रद्धा व्यक्त करता येणार आहे. दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर पांढरी फुले, बेलाची पाने (बेलफूल) आणि धोतऱ्याची फुले वाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाविकांच्या भावनांचा आदर राखून गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे. हा निर्णय केवळ श्रावण महिन्यातील गर्दीच्या कालावधीसाठी असून, महिन्यानंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे श्रावणात घृष्णेश्वराचे दर्शन अधिक सुलभ आणि जलद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT