Gas Pipeline : शहराला २० डिसेंबरपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gas Pipeline : शहराला २० डिसेंबरपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा

श्रीगोंदा ते वाळूज पाईपलाईन चार्ज, केंद्राची एनओसी मिळताच वितरणाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

Gas supply to the city through pipeline from December 20

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा ते छत्रपती संभाजीनगर या पीएनजी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (बीपीसीएल) केंद्रीय पेट्रोलियम सुरक्षा संघटनेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळणार आहे. त्यानंतर २० डिसेंबरपर्यंत शहरातील घरगुती तसेच औद्योगिक वसाहतींना पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा सुरू केला जाईल, असे माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी (दि.२८) सांगितले.

खा. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बीपीसीएलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल टंडन यांच्या नेतृत्वाखाली सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. यात महाराष्ट्र हेड मिलिंद लभाने, प्रादेशिक व्यवस्थापक मनोज जाधव, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अनिकेत कुलकर्णी, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष उत्सव माच्छर आणि सीएमआयचे सचिव अथर्वराज नंदावत उपस्थित होते. या बैठकीत गॅस पाईपालाईनच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यात विशाखापट्टणम मुख्य पाईपलाईनमधून श्रीगोंदा येथे जोडणी घेऊन छत्रपती संभाजीनगर, वाळूज आणि शेंद्रा अशी २५० किलो मीटर लांबीची मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन २४ इंच डायमीटर व्यासाची असून, पूर्णतः स्टील बॉडीची आहे.

प्रथम वाळूजच्या उद्योगांना पुरवठा

शहरातील एक लाख पीएनजी गॅस मीटर बसविण्यात आले आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्येही १२० किमी अंतर्गत लाईन पूर्ण झाली असून, तीन मोठ्या उद्योगांना प्रारंभी पुरवठा करण्यात येणार आहे.

दोन टप्प्यांत गॅस पुरवठा

श्रीगोंदा-वाळूज पाईपलाईनमध्ये गॅस चार्ज केला असून, घरगुती आणि औद्योगिक जोडण्या सुरू आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाळूज-शेंद्रापर्यंत गॅस पुरवठा सुरू केला जाणार आहे.

१० हजार घरांना पुरवठा

छत्रपती संभाजीनगर मनपा क्षेत्रातील झोन ७, ८ आणि ९ गारखेडा परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर, ज्योतीनगर, बन्सीलालनगर, प्रतापनगर आणि बीड बायपास भागात सुमारे १२० किमी अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही लाईन ९० मिमी, ६० मिमी आणि ३२ मिमी व्यासाची आहे. त्यातून घरगुती पीएनजी पुरवठा केला जाणार आहे. शहरात १० हजार ग्राहकांना पुरवठा होणार आहे.

४५०० कोटींचा खर्च

केंद्र सरकारच्या शहर गॅस वितरण (सीजीडी) प्रकल्पांतर्गत बीपीसीएलमार्फत तब्बल ४५०० कोटी खर्च करून मुख्य व अंतर्गत पाईपलाईन नेटवर्क उभे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT